महापुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्यास उद्धव ठाकरेंकडून खीळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप
By अशोक डोंबाळे | Updated: May 23, 2025 18:53 IST2025-05-23T18:51:21+5:302025-05-23T18:53:11+5:30
७२ तासांचा मुख्यमंत्री असताना मंजुरी

महापुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्यास उद्धव ठाकरेंकडून खीळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप
अशोक डोंबाळे
सांगली : मी राज्याचा ७२ तासांचा मुख्यमंत्री असताना महापुराचे पाणी दुष्काळी तालुक्यांसह मराठवाड्याला देण्याच्या फाईलवर सही केली होती. त्यानंतर सत्तेवर आलेले तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कामाला खीळ घातली होती, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. येत्या १५ दिवसात या कामाची निविदा निघेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
सांगलीत भाजपच्या मेळाव्यात त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत मते मांडली. ते म्हणाले, कोल्हापूर, सांगली भागातील पूर व्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यात १५० टीएमसी अतिरिक्त पाणी दुष्काळी मराठवाड्याकडे वळवणे, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अर्थसाह्य करण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन्ही भागांना मोठा दिलासा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे.
या प्रकल्पाला मी मंजुरी दिली होती. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होताच या कामाला खीळ घातली होती. महायुती पुन्हा सत्तेवर येताच महापुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्याच्या प्रकल्पाला लगेच गती दिली. पाऊस येणार, तो आपण थांबवू शकणार नाही. पण, पुराचे जवळपास १५० टीएमसी पाणी वाहून समुद्रात जात आहे. या पाण्यावर कर्नाटक, महाराष्ट्राचा कुणाचाच हक्क नाही. यामुळेच पुराचे पाणी साठवण्याच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या कामाला गती देणार आहे. येत्या १५ दिवसात या कामाचे भूमिपूजन होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
असा आहे जागतिक बँकेचा प्रकल्प
जागतिक बँकेच्या पथकाने १२ सप्टेंबर २०१९ रोजी पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रकल्प करण्याचे निश्चित झाले होते. या प्रकल्पात जागतिक बँक सुमारे २३२८ कोटी रुपये, तर राज्य सरकार सुमारे ९९८ कोटी रुपये उपलब्ध करुन देणार आहे. एकूण ३ हजार ३२४ कोटी ६३ लाख रुपयांचा हा प्रकल्प आहे.