कुरळप : येडेनिपाणी (ता. वाळवा, सांगली) हद्दीतील एका ढाब्यासमोर शनिवारी सकाळी सहाच्या दरम्यान रिक्षा (एमएच १०, जी २३२७)ला पाठीमागून येणाऱ्या चारचाकीने धडक दिल्याने रिक्षा मुख्य रस्त्यावरून बारा फूट खाली पडली. यामध्ये अक्काताई भुजंगा येडके (वय ७०, रा. नागाव) व शारदा लक्ष्मण सुपणे (वय ५०, रा. इस्लामपूर धनगर गल्ली, ता. वाळवा) यांचा जागीच मृत्यू झाला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अक्काताई येडके यांना अर्धांगवायू झाल्याने मागील चार महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील पोरले येथे औषधोपचार सुरु होते. या औषधाने अक्काताई यांना फरक पडल्याने पाच महिन्यांचा औषधांचा कोर्स सुरु होता. आज शेवटचा कोर्स असल्याने या मायलेकी इस्लामपूरहून रिक्षाने निघाल्या होत्या. मात्र, येडेनिपाणी फाटा हद्दीत येताच पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या चारचाकीने रिक्षाला जोराची धडक दिली.
धडक इतकी जोरात होती की, रिक्षा मुख्य रस्त्यावरून बारा फूट खाली सेवा रस्त्यावर पडली. यामध्ये पाठीमागे बसलेल्या मायलेकी रिक्षातून दहा-पंधरा फूट लांब रस्त्यावर जाऊन पडल्या. दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षा चालकाला किरकोळ दुखापत झाली. यामध्ये रिक्षाचे तीस हजारांचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, सलमान मुलाणी, पो.कॉ. बाबर यांच्यासह टीम घटनास्थळी हजर झाली.
पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अपघातातील चारचाकी चालक रामदास नामदेव सुतार (रा. मोरेवाडी, ता. भुदरगड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कुरळप पोलीस करत आहेत.