Two killed in accident near Savard | मृतदेह रात्रभर पडून ; सावर्डेजवळ अपघातात महिलेसह दोन ठार
अपघातात चक्काचूर झालेली मोटारसायकल.

ठळक मुद्देदुचाकी झाडावर आदळली

तासगाव : मणेराजुरी-सावर्डे रस्त्यावर दुचाकी झाडावर आदळून महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. प्रवीण ऊर्फ अप्पू तमण्णा भिसे (वय ३५, रा. मुरुंगडी, ता. अथणी) व सुरेखा काशिनाथ नाईक (२७, रा. लिंगनूर, ता. मिरज) अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री फुटका घाण्याजवळील अपघाती वळणावर घडला. आसपास वस्ती नसल्यामुळे बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

प्रवीण ऊर्फ अप्पू तमण्णा भिसे हा सावर्डे येथील फुटका घाणा परिसरातील पोपट माळी यांच्या द्राक्षबागेत शेतमजूर म्हणून पंधरा दिवसांपासून कामाला येत होता. मंगळवारी रात्री नऊ वाजेपर्यंत बागेत औषध फवारणी करून तो त्याच्या खोलीवर परतला, पण रात्री उशिरा तो मालकाची दुचाकी (क्र. एमएच १० एएल १४४५) घेऊन मालगाव (ता. मिरज) येथे गेला. येथून तो सुरेखा काशिनाथ नाईक या महिलेस घेऊन रात्री उशिरा सावर्डेकडे परतत होता. फुटक्या घाण्याजवळील धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने भरधाव दुचाकी थेट रस्त्याकडेच्या लिंबाच्या झाडावर आदळली. यामध्ये दोघेही उडून रस्त्यावर पडले. हा परिसर निर्जन असल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी दुचाकीचे अवशेष विखरून पडले होते. सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या वस्तीवरील ग्रामस्थांना अपघात झाल्याचे दिसले. त्यांनी तासगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली.
मृत प्रवीण यास दोन मुले, पत्नी असून, ते सर्व अथणी येथे मजुरी करतात. सुरेखा हिला चार अपत्ये आहेत. अपघातामुळे दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी पोलीस पाटील सुरेश खराडे-पाटील व पंचायत समिती सदस्य अमोल माळी यांनी धाव घेऊन याची पोलिसांना व नातेवाईकांना माहिती दिली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास सहायक निरीक्षक रत्नदीप साळुंखे करीत आहे.

 

Web Title:  Two killed in accident near Savard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.