गणेश विसर्जनावेळी कसबे डिग्रज, पद्माळेत दोघे बुडाले; एकाचा मृतदेह काढला, तरूणाचा अद्याप शोध सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 20:36 IST2025-09-03T20:36:32+5:302025-09-03T20:36:40+5:30

गणेश विसर्जनाच्या सातव्या दिवशी मंगळवारी कसबे डिग्रज येथील कृष्णा नदी काठावर गणेश भक्तांची गर्दी झाली होती. घरगुती गणपती व काही मंडळांच्या गणपतीचे विसर्जन सायंकाळपासून सुरू होते.

Two drown in Kasbe Digraj during Ganesh immersion; One body recovered, search for youth still on | गणेश विसर्जनावेळी कसबे डिग्रज, पद्माळेत दोघे बुडाले; एकाचा मृतदेह काढला, तरूणाचा अद्याप शोध सुरूच

गणेश विसर्जनावेळी कसबे डिग्रज, पद्माळेत दोघे बुडाले; एकाचा मृतदेह काढला, तरूणाचा अद्याप शोध सुरूच

लाेकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या सातव्या दिवशी मंगळवारी कसबे डिग्रज आणि पदमाळे ता. मिरज येथे दोघेजण कृष्णा नदीत बुडाले. यापैकी अरुण मुरलीधर देसाई (वय ६० रा. कसबे डिग्रज) यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तर पद्माळे येथे बुडालेल्या आदित्य चंद्रकांत नलावडे (वय २२ रा. कवलापूर, ता. मिरज) याचा मंगळवारी रात्री आणि बुधवारी शोध घेण्यात आला.

गणेश विसर्जनाच्या सातव्या दिवशी मंगळवारी कसबे डिग्रज येथील कृष्णा नदी काठावर गणेश भक्तांची गर्दी झाली होती. घरगुती गणपती व काही मंडळांच्या गणपतीचे विसर्जन सायंकाळपासून सुरू होते. कसबे डिग्रज येथील अरुण देसाई हे गणेश मूर्ती घेऊन नदीपात्रात गेले होते. मूर्ती पात्रामध्ये विसर्जन करून परत येताना देसाई यांना दम लागला. गर्दीमुळे हा प्रकार लवकर निदर्शनास आला नाही. देसाई यांच्या मुलाने हा प्रकार काठावरून पाहिला. त्याने आरडाओरड करून पोहणाऱ्यांना सांगितले. त्यामुळे काहीजण देसाई यांना वाचवण्यासाठी पोहत गेले. परंतु पाण्याच्या प्रवाहाला वेग असल्यामुळे देसाई वाहून गेले. सांगली ग्रामीण पोलिसांना हा प्रकार कळवला. त्यांनी स्पेशल रेस्क्यू फोर्स ला पाचारण केले. स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, महेश गव्हाणे, सागर जाधव, आकाश कोलप, सचिन माळी, असिफ मकानदार, कृष्णा हेगडे, अमीर नदाफ यांनी बोटीतून देसाई यांचा शोध सुरू केला. काही अंतरावर देसाई यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. तो बोटीतून बाहेर काढला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला.
दरम्यान पद्माळे येथे कृष्णा नदीत गणेश मूर्ती विसर्जनासाठी मंगळवारी रात्री कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. कवलापूर येथील विघ्नहर्ता मंडळाचे कार्यकर्ते मूर्ती विसर्जनासाठी आले होते. आदित्य नलावडे हा मूर्ती विसर्जनासाठी रात्री साडे दहाच्या सुमारास नदीपात्रात उतरला होता. त्याला विहिरीत पोहण्याचा सराव होता. परंतू नदीतील वाहत्या पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो वाहून गेला. तो वाहून गेल्याचे समजताच काठावर आरडाओरड झाला. पाण्याला वेग असल्यामुळे अंधारात तो दिसेनासा झाला. तत्काळ सांगली ग्रामीण पोलिसांना कळवले. त्यांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सला, रॉयल बोट क्लबला कळवले. रात्री ११ पासून आदित्यचा शोध घेण्यास सुरूवात केला. प्रवाहाला वेग असल्यामुळे अडथळे येत होते. मध्यरात्रीनंतर दोनपर्यंत शोध घेतला. त्यानंतर मोहिम थांबवली. बुधवारी सकाळी पुन्हा शोध घेण्यात आला. परंतू आदित्य सापडला नाही.

सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत उशिरापर्यंत नोंद नव्हती.

मुलासमोरच वडील वाहून गेले

कसबे डिग्रज येथे विसर्जनावेळी गर्दी झाली होती. अरूण देसाई हे पात्रात उतरले होते. त्यांना दम लागल्याचे मुलाला निदर्शनास आले. त्याने आरडाओरड केला. तसेच पात्रात उडी घेतली. परंतू प्रवाहामुळे मुलाच्या डोळ्यासमोर वडील वाहून गेले.

Web Title: Two drown in Kasbe Digraj during Ganesh immersion; One body recovered, search for youth still on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.