सांगलीत दोन नेत्यांच्या दोन जिल्हा क्रिकेट संघटना; आता 'नॉट आऊट'चा सिग्नल कोणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 19:03 IST2025-09-11T19:03:09+5:302025-09-11T19:03:26+5:30

खेळाडूंसह पालकांमध्ये संभ्रमावस्था : राज्य संघटना तोडगा काढणार काय?

Two district cricket organizations of two leaders in Sangli | सांगलीत दोन नेत्यांच्या दोन जिल्हा क्रिकेट संघटना; आता 'नॉट आऊट'चा सिग्नल कोणाला?

सांगलीत दोन नेत्यांच्या दोन जिल्हा क्रिकेट संघटना; आता 'नॉट आऊट'चा सिग्नल कोणाला?

सांगली : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेकडून १४ वर्षांखालील निवड चाचणी स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या निर्देशित समितीपैकी तीन सदस्यीय गटाने स्पर्धेस प्रारंभ केला आहे तर बहुमत असलेल्या आठ सदस्यांच्या गटाने स्पर्धेस विरोध दर्शविला आहे. त्यामुळे खेळाडू आणि पालक यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. राज्य संघटनेने तत्काळ तोडगा न काढल्यास निवड चाचणी स्पर्धा बंद पाडण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या निर्देशित समितीमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. पाच सदस्यांनी एकत्र येत संजय बजाज यांना धक्का दिला. पाच सदस्यांनी मृत सदस्य मदन पाटील, विनायक मिराशी, गिरीश दातार यांच्या रिक्त जागेवर सम्राट महाडिक, पृथ्वीराज पवार, मारूती गायकवाड यांनी निवड केली. तसेच समितीने बैठक बोलावून सम्राट महाडिक यांची अध्यक्षपदी निवड केली तर दुसऱ्या गटातील सदस्य संजय बजाज यांनी स्वत:ला अध्यक्ष घोषित करून सी. के. पवार यांची कार्याध्यक्षपदी, किशोर शहा यांची सचिवपदी निवड जाहीर केली.

आता समितीच्या एका गटाकडे आठजणांचे बहुमत तर दुसऱ्या गटाकडे तीन जण असे चित्र निर्माण झाले आहे. सद्यस्थितीत अनेक क्लब, प्रशिक्षक, अंपायर यांनी बहुमताकडे कल दर्शवून पाठिंबा दिला आहे.

समितीमधील दोन गटांत वाद सुरू असताना खेळाडू आणि पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तशातच तीन सदस्यीय गटाने १४ वर्षांखालील मुले-मुली निवड चाचणी सुरू केली आहे. राज्य संघटनेकडून अधिकृत स्पर्धेचा कार्यक्रम नसताना ही निवड चाचणी सुरू आहे. त्यामुळे बहुमत असलेल्या गटाने ही निवड चाचणी अनधिकृत असल्याचे सांगितले आहे. मात्र, या गटाकडे असलेल्या सात क्लबमधील शेकडो खेळाडू आणि पालक चिंतेत आहेत. त्यांनी क्लबमधील पदाधिकाऱ्यांना विचारणा सुरू केली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य संघटनेने तोडगा काढावा, अशी मागणी बहुमत असलेल्या गटाने केली आहे. अन्यथा संतप्त पालक, खेळाडूंना घेऊन स्पर्धा बंद पाडण्याचा इशारा दिला आहे.

बहुमताने निर्णय हवा

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या निर्देशित समितीने बहुमताने निर्णय घ्यावा असे निर्देश आहेत. सध्या बहुमत नसलेल्या गटाने स्पर्धेबाबत कोणत्याही सूचना नसताना आयोजन केले आहे. हट्टाने पेटून हा प्रकार केला जात आहे. लवकरच आम्ही राज्य संघटनेच्या निर्देशानुसार स्पर्धेचे आयोजन करणार असल्याचे सहसचिव जयंत टिकेकर यांनी सांगितले.

राज्य संघटना अद्याप गप्प का

सांगली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या निर्देशित समितीमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी वादावर तोडगा काढावा, अशी खेळाडू आणि पालकांमधून मागणी होत आहे.

दोन संघ पाठवणार काय

राज्य संघटनेकडून १४ वर्षे गटाच्या निवडीचा कार्यक्रम नसताना सांगलीत एका गटाकडून चाचणी स्पर्धा घेतली जात आहे तर दुसऱ्या गटाने देखील निवड स्पर्धा घेण्याची तयारी केली आहे. त्यामुळे सांगलीतून दोन संघ पाठविले जाणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या सांगलीत घेतली जात असलेली निवड चाचणी स्पर्धा अधिकृत नाही. कायदेशीरदृष्ट्या आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे दुसऱ्या गटाने यामध्ये राजकारण आणू नये. खेळाडूंचे नुकसान करू नये. आम्ही लवकरच अधिकृत स्पर्धा घेणार आहोत. -सम्राट महाडिक, अध्यक्ष, सांगली जिल्हा क्रिकेट संघटना

Web Title: Two district cricket organizations of two leaders in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.