कामातील हलगर्जीपणा भोवला, सांगली महापालिकेचे दोन शाखा अभियंते निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 18:59 IST2025-11-06T18:57:44+5:302025-11-06T18:59:01+5:30
आयुक्तांचा दणका : दोघा अधीक्षकांची वेतनवाढ रोखली

कामातील हलगर्जीपणा भोवला, सांगली महापालिकेचे दोन शाखा अभियंते निलंबित
सांगली : महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी बांधकाम विभागातील शाखा अभियंता आलम अत्तार व पंकजा रुईकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर नगररचना विभागाचे अधीक्षक सुहास व्हटकर व बांधकाम विभागाचे अधीक्षक राजेश शिंदे यांची वेतनवाढ रोखण्याचे आदेशही आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले. आयुक्तांच्या दणक्याने महापालिकेत खळबळ उडाली आहे.
महापालिकेच्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त सत्यम गांधी यांनी सोमवारी बैठक घेतली होती. या बैठकीत शासकीय पत्रव्यवहार, लोकायुक्त प्रकरणे, मुख्यमंत्री सचिवालयातील संदर्भ तसेच विधानसभेतील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. बांधकाम व नगररचना विभागातील अधीक्षकांना त्यांच्या विभागातील प्रलंबित कामांची माहिती नव्हती.
आयुक्तांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. त्यांना कर्तव्यांची जाणीव नसल्याचे व प्रशासकीय जबाबदारीत हलगर्जीपणा केला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नगररचना विभागाचे अधीक्षक सुहास व्हटकर व बांधकाम विभागाचे अधीक्षक राजेश शिंदे यांची वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली.
कार्यपद्धतीनुसार काम न करणे, विनापरवाना गैरहजर राहणे, तसेच वरिष्ठांच्या आदेशात ढिलाई केल्याचे उपअभियंत्यांच्या अहवालावरून स्पष्ट झाले होते. त्यांचे कामकाज असमाधानकारक ठरल्याने शाखा अभियंते पंकजा अरविंद रुईकर व आलम अजीज अत्तार यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. आयुक्त सत्यम गांधी यांनी ही कारवाई केली.
नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करणे आणि प्रशासकीय शिस्त राखणे, ही प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याची जबाबदारी आहे. यापुढे कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा किंवा कर्तव्यात कसूर आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त गांधी यांनी दिला आहे.