बांगलादेशातून वेश्या व्यवसायासाठी तरूणींची तस्करी करणारे दोघे अटकेत; एलसीबीची कारवाई
By शरद जाधव | Updated: September 22, 2023 18:52 IST2023-09-22T18:51:53+5:302023-09-22T18:52:30+5:30
नोकरीच्या आमिषाने तरूणींना बेकायदेशीरपणे बांगलादेशातून आणून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले.

बांगलादेशातून वेश्या व्यवसायासाठी तरूणींची तस्करी करणारे दोघे अटकेत; एलसीबीची कारवाई
सांगली: नोकरीच्या आमिषाने तरूणींना बेकायदेशीरपणे बांगलादेशातून आणून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले. रूपा उर्फ सपना अबुलकाशीम शेख (वय ३२, सध्या रा. गोसावी गल्ली, उत्तमनगर, मिरज, मूळ बायचर पो. हातीया बझार जि. नोवाकाली, बांगलादेश) आणि कालू उर्फ खालीफ रियाजुद्दीन मंडल (४७, रा. नवीनग्राम सागरपारा मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल) अशी संशयितांची नावे आहेत.
भारतात नाेकरी मिळवून देतो या आमिषाने बांगलादेशातील अल्पवयीन मुली, तरूणींची तस्करीचे प्रकार वाढले होते. त्या अल्पवयीन, तरुणींचीही फसवणूक केली जात होती. या पिडीतांना सांगली, मिरजेत आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. या गुन्ह्यातील संशयितांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिले होते. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने पश्चिम बंगालमध्ये जावून ही कारवाई केली. पोलिसांच्या पथकाला माहिती मिळाली की, तस्करी करणारी संशयित रूपा ही मिरजेत सपना नावाने राहत असून, ती वेश्या व्यवसाय करते. त्यानुसार पथकाने तिला ताब्यात घेत चौकशी केली. यात रूपा ही बांगलादेशातून मुलींना आणून त्यांना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणातील दुसरा संशयित कालू हा पश्चिम बंगाल येथून असून तो तिथून सुत्रे हालवत होता. खालीफ रियाजुद्दीन मंडल हा कालू या टोपन नावाने ओळखला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने तिथे जावून स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. संशयित कालू हा बांगलादेशातून तरुणींना फूस लावून आणि नोकरीच्या आमिषाने आणून त्यांना संशयित रूपाच्या ताब्यात तो देत होता.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, पंकज पवार, संजय कांबळे, इम्रान मुल्ला, प्रकाश पाटील, राजू शिरोळकर, प्रतिक्षा गुरव, अभिजित गायकवाड, महेश गायकवाड आदींच्या पथकाने कारवाई केली.