Sangli: वीस वर्षांपासून बेपत्ता; नेपाळमध्ये सापडलेल्या वृद्धाला डोंगरसोनीत सोडले, रिहबिलिटेशन फाउंडेशनची माणुसकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 13:02 IST2025-02-04T13:01:43+5:302025-02-04T13:02:29+5:30
कुटुंबीयांना सुखद धक्का

Sangli: वीस वर्षांपासून बेपत्ता; नेपाळमध्ये सापडलेल्या वृद्धाला डोंगरसोनीत सोडले, रिहबिलिटेशन फाउंडेशनची माणुसकी
तासगाव : वीस वर्षांपूर्वी मानसिक रुग्ण झालेल्या डोंगरसोनी (ता. तासगाव) येथील तुकाराम शिंदे ही व्यक्ती घरातून बेपत्ता झाली. तब्बल २० वर्षानंतर सोमवारी रिहबिलिटेशन फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी थेट डोंगरसोनीत आणून शिंदे यांच्या घरी त्यांच्या कुटुंबीयांना भेटवले. कुटुंबीयांना सुखद धक्का दिला. वीस वर्षांपूर्वी गावातून बेपत्ता झालेले शिंदे चक्क नेपाळमध्ये सापडले होते.
तुकाराम शिंदे यांचा डोंगरसोनी गावात सलून व्यवसाय होता. त्यांना पत्नी आणि एक मुलगा आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी त्यांना मानसिक आजार झाला होता. याच आजाराने ते गाव सोडून गेले. त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक वर्ष शोध घेतला. मात्र कोठेच शोध लागला नाही. पोलिसांनीदेखील शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर कुटुंबीयांनी शिंदे परत येतील, ही अशा सोडून दिली होती. मात्र अनपेक्षितपणे शिंदे यांच्या पत्नी आणि मुलाला सोमवारी शिंदे यांच्या घरी आगमन झाल्यामुळे सुखद धक्का बसला.
मानसिकदृष्ट्या आजारी असणाऱ्या रुग्णांसाठी काम करणारे श्रद्धा रिहबिलिटेशन फाउंडेशन या संस्थेचे पदाधिकारी काही दिवसांपूर्वी नेपाळ येथील काही रुग्णांना सोडण्यासाठी नेपाळला गेले होते. यावेळी तेथे अशाच प्रकारे काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेत मराठी भाषिक असणारे शिंदे आढळून आले. त्यानंतर शिंदेंना घेऊन हे संस्थेचे पदाधिकारी मुंबई येथे आले.
अधिक तपास केल्यानंतर शिंदे यांचे मूळ गाव डोंगरसोनी असल्याचे समजले. त्यानंतर संस्थेचे अजय रणमुरे आणि मनीषा भराडिया हे तुकाराम शिंदे यांना घेऊन थेट त्यांच्या घरी दाखल झाले.
यावेळी माजी उपसरपंच किशोर कोडग, माजी पंचायत समिती सदस्य दिनकर झांबरे, रघुनाथ झांबरे सर्जेराव झांबरे त्यांचे कुटुंबीय यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.