जिल्हा परिषद भरतीच्या पारदर्शीपणाचा फुगा फुटला...
By Admin | Updated: December 1, 2015 00:10 IST2015-11-30T23:09:15+5:302015-12-01T00:10:41+5:30
विश्वासाला तडे : प्रक्रियेला पेपर फुटीचा डाग; प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचे प्रशासनासमोर आव्हान

जिल्हा परिषद भरतीच्या पारदर्शीपणाचा फुगा फुटला...
सांगली : संगणकीय प्रणालीद्वारे जलदगतीने जाहीर होणारे निकाल, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता, परीक्षा केंद्रांवरील कडक सुरक्षा अशा अनेक व्यवस्थांचे दाखले देऊन जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेसाठी पारदर्शीपणाचा फुगविलेला फुगा पेपर फुटीच्या प्रकरणाने फुटला. फेरपरीक्षेचा उतारा टाकला असला तरी, गैरप्रकाराने प्रक्रियेला मोठा डाग लागला आहे.
प्रामाणिकपणे कष्ट करून भरतीसाठी प्रचंड मेहनत घेणाऱ्या हजारो इच्छुकांच्या मनात पारदर्शीपणाची खात्री तयार करण्याचे काम भरतीपूर्वी करण्यात आले. लेखी स्वरुपातील परीक्षेचा निकाल लगेचच दोन तासांनी जाहीर केला जाणार होता. वास्तविक त्यापद्धतीने ही प्रक्रिया पार पडली. उत्तरपत्रिकांमध्ये फेरबदल होण्याची कोणतीही शंका उमेदवारांच्या मनात राहणार नाही, याची खबरदारी म्हणून आधुनिक प्रणालीचा वापर करण्यात आला. परीक्षेपूर्वी पारदर्शीपणाच्या कडक व्यवस्थांची माहिती प्रशासकीय पातळीवर देण्यात आली. त्यामुळे भरतीसाठी तयारी केलेल्या प्रामाणिक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या. कष्टाचे चीज होईल म्हणून अनेकांनी स्वप्ने रंगविली. पण या स्वप्नांना आणि आशेला पहिल्याच घासावेळी धक्का लागला.
आरोग्य सेवक (महिला) या पदासाठीच्या लेखी परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्रकार बुधवारी दुपारी परीक्षेदरम्यान उघडकीस आला़ याप्रकरणी दोन आरोग्य सेविकांविरुद्ध जिल्हा परिषद प्रशासनाने सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक चौकशीनंतर शेटफळे आरोग्य उपकेंद्रातील कंत्राटी आरोग्य सेविका शाहीन अजमुद्दीन जमादार (रा. करगणी, ता़ आटपाडी) हिला बडतर्फ केले, तर तिला मदत करणारी नियमित आरोग्य सेविका शकिरा उमराणीवर निलंबनाची कारवाई केली. कारवाई झाली म्हणून प्रश्न सुटलेला नाही. प्रक्रियेविषयीच्या प्रामाणिक उमेदवारांच्या मनातील विश्वासाला गेलेले तडे भरून निघणारे नाहीत. कितीही आधुनिक प्रणालींचा, कडक सुरक्षेचा व पारदर्शीपणाचा दाखला आता प्रशासकीय पातळीवर दिला गेला तरी, त्यावर कोणी विश्वास ठेवेल का?, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
पोलिसांत कॉपीप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पेपर फुटीचा उल्लेख कुठेही नाही. प्रशासकीय पातळीवर सुरू असलेल्या चौकशीतूनही अद्याप काही निष्पन्न झालेले नाही. उजेडात आलेला प्रकार पाहता, तो कॉपीचा प्रकार नसून पेपर फुटीचा असल्याचेच दिसत आहे. उमेदवारांनाही तशीच शंका आहे. पेपरफुटी झाली असेल, तर त्यामागे निश्चितपणे एखादी मोठी साखळीही असण्याचा संशय बळावला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी उमेदवारांमधून होत आहे. उमेदवारांमधून प्रक्रियेविषयीच्या निर्माण झालेल्या शंकांना पूर्णविराम द्यायचा असेल, तर प्रकरणाचा छडा लावून कारवाई होण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
असे झाले प्रकरण
पहिल्या दिवशी औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला) आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांसाठी परीक्षा होती़ आरोग्य सेवक (महिला) पदाच्या ३८ जागांसाठी ९१५ उमेदवार होते़ दुपारी दोन वाजता आरोग्य सेवक (महिला) या पदासाठी लेखी परीक्षा होती़ ग़ रा़ पुरोहित कन्या प्रशालेतील वर्ग क्रमांक आठ येथे पर्यवेक्षकांनी प्रश्नपत्रिका देण्यापूर्वी उमेदवारांना उत्तरपत्रिका दिली़ या वर्गातील शाहीन अजमुद्दीन जमादार (रा. करगणी, ता़ आटपाडी) या उमेदवाराने प्रश्नपत्रिका हातात पडण्यापूर्वीच उत्तरे लिहिण्यास सुरुवात केली़ वर्गातील शेजारच्या उमेदवारांना त्याबाबत शंका आली़ प्रश्नपत्रिकेपूर्वीच उत्तरपत्रिका लिहिली जात असल्याबाबत पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आणून दिले़ पर्यवेक्षकाने जाब विचारल्यानंतर शाहीनने बाथरुमला जाण्याचा बहाणा केला़ बाथरुमला गेल्यानंतर ती पायजमा बदलून आली़ कपडे बदलल्यानंतरही तिच्या पायजम्यावर उत्तरे लिहिली असल्याचे निदर्शनास आले़ पर्यवेक्षक आणि केंद्र प्रमुखांनी शाहीनची चौकशी केल्यानंतर तिची बोबडी वळली़ प्रश्नपत्रिका मिळण्यापूर्वीच शाहीनने अर्ध्याहून अधिक उत्तरे लिहिली होती़
यंत्रणेलाच आव्हान
पेपर फुटीच्या प्रकरणातून प्रशासकीय स्तरावर करण्यात आलेल्या सर्व व्यवस्थांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न झाला आहे. खऱ्या सूत्रधारावर कारवाई करून संपूर्ण प्रकरण उजेडात आले, तरच पुन्हा प्रामाणिकपणे भरतीसाठी मेहनत घेणाऱ्यांच्या मनात किमान काहीअंशी विश्वास निर्माण केला जाऊ शकतो. कारण शाहीन जमादारने आणखी चलाखी दाखवून प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतरच उत्तरे लिहिली असती, तर कदाचित या गोष्टी कोणाच्या लक्षातसुद्धा येण्याची शक्यता नव्हती.