Gram Panchayat Elections: तोफा आज थंडावणार; प्रचारासाठी आज अखेरचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 12:58 IST2022-12-16T12:57:05+5:302022-12-16T12:58:19+5:30
सांगली जिल्ह्यातील ४१७ ग्रामपंचायतींमधील ९७२४ उमेदवारांचा लागणार कस

Gram Panchayat Elections: तोफा आज थंडावणार; प्रचारासाठी आज अखेरचा दिवस
सांगली : ग्रामपंचायत निवडणुकीने गल्लोगल्लीचे राजकारण ढवळून काढणारा माहोल सध्या प्रत्येक गावांमध्ये बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील ४१७ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाचला प्रचाराच्या तोफा थंडावणार असून, छुप्या प्रचार सुरू होणार आहे. प्रचाराला अखेरचा एकच दिवस उरल्याने उमेदवार गल्लोगल्ली पिंजून काढत आहेत.
जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घोषित केल्या होत्या. यापैकी २८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. कडेगाव तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. यामुळे सध्या ४१७ ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचला आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाचनंतर जाहीर प्रचार थांबत असला तरी त्यानंतर छुप्या प्रचाराला सुरुवात होईल. हॉटेल आणि ढाबे हाऊसफुल्ल झाले आहेत. पुढील जुळवाजुळव होऊ लागली आहे.
भाऊ, दादा, अक्का, व्होट मला पक्का
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांसाठी प्रतिष्ठेची मानली जाते. पॅनल आणि सरपंच निवडून आणण्यासाठी नेत्यांनी शक्ती पणाला लावली आहे. ‘भाऊ, दादा, अक्का, व्होट मला पक्का’, अशी विनवणी सुरू आहे.
शुक्रवार, शनिवारची रात्र वैऱ्याची
शुक्रवारी सायंकाळी साडेपाचला प्रचार संपत असून, शनिवारी जाहीर प्रचारास बंदी आहे. रविवारी मतदान आहे. शुक्रवारी सायंकाळनंतर शनिवारी दिवसभर आणि रात्रभर अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अनेकांची नाराजी दूर करून वळवण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
४१७ ग्रामपंचायतींमधील ९७२४ उमेदवारांचा लागणार कस
जिल्ह्यातील निवडणूक लागलेल्या ४४७ ग्रामपंचायतींपैकी ३८ ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. विविध ग्रामपंचायतींमधील ५७० सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. सरपंचपदाच्या ४०९ जागांसाठी १ हजार १२०, तर ४ हजार १४६ सदस्यपदांसाठी ८ हजार ६०४ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.