कुंडल (जि. सांगली) : सावकारांच्या त्रासाला कंटाळून घोगाव (ता. पलूस) येथील महेश मोहन चव्हाण (४४) या तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने पोलिसांना पाठविलेल्या मेलमधून सावकारीचा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार पोलिसांनी सहा सावकारांवर गुन्हा दाखल केला आहे.कुंडल येथील सचिन संपत आवटे, दिलीप मारुती आवटे, तुषार शंकर चव्हाण, बब्बर लाड, अक्षय गरदंडे, प्रदीप संपत देशमुख, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात कुंडल पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मृत महेश चव्हाण याने सावकारांकडून व्यवसायासाठी व्याजाने काही रक्कम घेतली होती. संशयितांकडून गेली वर्षभर व्याजाच्या रकमेसाठी तगादा सुरू होता. सात ते आठ लाख रुपये व्याजापोटी मागणी करण्यात येत होती. या सर्व पैशाच्या वसुलीचे काम अक्षय गरदंडेमार्फत केले जात असल्याची तक्रार आहे. त्यानेही वारंवार फोन करून पैशासाठी धमकी दिल्याचे मेलमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी मोहन यशवंत चव्हाण यांनी फिर्याद नोंदविली आहे.
Sangli: पोलिसांना मेल केला, सावकारांच्या त्रासाला कंटाळून तरुणाने टोकाचा निर्णय घेतला; कुंडलच्या सहा जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 13:43 IST