एसटीची वसुली झाली तरच कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:25 IST2021-05-23T04:25:38+5:302021-05-23T04:25:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : एसटीची चाके गेल्या सव्वा वर्षांपासून थांबल्याने कर्मचाऱ्यांचे पगार कसे भागवायचे, हा मोठा प्रश्न निर्माण ...

एसटीची वसुली झाली तरच कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : एसटीची चाके गेल्या सव्वा वर्षांपासून थांबल्याने कर्मचाऱ्यांचे पगार कसे भागवायचे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच इतर काही बाहेरील विभागांनीही देणी थकवल्यानेही आर्थिक संकटात भर पडली आहे.
सांगली जिल्ह्यातील दहा आगारात ४ हजार ७३० कर्मचारी काम करतात. यामध्ये चालक-वाहकापासून अधिकारी, कार्यशाळेतील कर्मचारी व अन्य प्रशासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. महिन्याकाठी त्यांच्या पगारापोटी सात कोटी रुपये खर्ची पडतात. सध्या जिल्ह्यातील सर्व आगारातून वाहतूक थंडावली आहे. उत्पन्न काहीच नसताना कोट्यवधींच्या पगाराचा भार महामंडळावर पडत आहे. कोरोनापूर्वी दररोज साडेचार हजार फेऱ्या व्हायच्या, कोरोनामध्ये त्या हजारपेक्षाही कमी झाल्या. गेल्या महिन्याभरापासूनच्या लॉकडाऊनमध्ये तर त्या पूर्ण बंद आहेत. फक्त मालवाहतूक काही प्रमाणात सुरू आहे.
उत्पन्नच नसेल तर पगार कसे भागवायचे? हा प्रश्न प्रशासनापुढे आहे. महामंडळातर्फे टपाल खात्याला सेवा दिली जाते. त्याशिवाय खासगी मालवाहतूकही केली जाते. याव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी पास, विद्यार्थिनींचा मोफत प्रवास इत्यादी सवलतीही दिल्या जातात. निवडणुकांसाठी गाड्यांचा वापर, स्थानकातील व्यावसायिकांकडून मिळणारे भाडे, मुंबईला बेस्ट उपक्रमासाठी सेवा देणे या माध्यमातून बरेच उत्पन्न एसटीला मिळते. लॉकडाऊन काळात या व्यवसायाने एसटीला मोठा आधार दिला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना वॉरंटसाठी प्रवास दिल्यानेही एसटीच्या उत्पन्नात भर पडते.
पण यातील बरीच शासकीय देणी सध्या प्रलंबित आहेत. टपाल, पोलीस खाते, बेस्ट, म्हाडासाठी प्रवासी सेवा, ज्येष्ठ नागरिकांना सवलत आदी येणी मात्र रखडत आहेत. आर्थिक टंचाईच्या काळात हे पैसे मिळणे एसटीसाठी महत्त्वाचे आहे. त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले. पैकी म्हाडाकडून राज्याला २९७ कोटी रुपये नुकतेच मिळाले, बेस्टकडूनही मिळू लागले आहेत.
पॉइंटर्स
जिल्ह्यातील एकूण आगार - १०
एकूण कर्मचारी - ४७३०
सध्याचे रोजचे मालवाहतुकीतून उत्पन्न - १,२५,०००
महिन्याला पगारासाठी होणारा खर्च - ७,५०,००,०००
कोट
ड्युट्या बंद असल्या तरी एसटीने वेतन थांबवलेले नाही. गरजेनुसार आम्हीदेखील ड्युटीवर हजर राहत आहोत. एसटीचे उत्पन्न थांबले तर पगार कसे होणार याची चिंता कर्मचाऱ्यांनाही लागून राहिली आहे.
- अशोक गंगणे, कर्मचारी
पहिल्या लॉकडाऊनसारखी गंभीर स्थिती दुसऱ्या लाटेत नाही. एसटीची चाके थांबली असली तरी महामंडळाने कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडलेले नाही. लाॅकडाऊन संपून एसटी सेवा पुन्हा सुरू होण्याची आम्हाला प्रतीक्षा आहे.
- नौशाद आंबेकरी, कर्मचारी
एसटीची सर्व शासकीय देणी मिळाली तर महामंडळाला अडचण येणार नाही. सध्याची परिस्थिती कठीण असली तरी कर्मचारी सुरक्षित ठेवण्यात महामंडळाने प्राधान्य दिले आहे. सध्या वेतन मिळत असले तरी लॉकडाऊन लवकर संपण्याची गरज आहे.
- डी. डी. पटेल, कर्मचारी
सध्या प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद आहे, त्यामुळे त्यापासूनचे उत्पन्न थांबले आहे. मालवाहतूक मात्र सुरू आहे. त्यातून सरासरी सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. विविध शासकीय विभागांकडील थकबाकीची माहिती वरिष्ठ कार्यालयांना कळवली जाते.
- अरुण वाघाटे, प्रभारी विभाग नियंत्रक, सांगली