इस्लामपुरातील गांडूळ खत प्रकल्पाचे तीनतेरा
By Admin | Updated: August 11, 2015 00:31 IST2015-08-11T00:31:49+5:302015-08-11T00:31:49+5:30
नवीन योजनांची तयारी : घनकचरा नियोजनाच्या अभ्यासासाठी पालिकेचे नेते मुंबई दौऱ्यावर

इस्लामपुरातील गांडूळ खत प्रकल्पाचे तीनतेरा
अशोक पाटील- इस्लामपूर शहरात घनकचऱ्यापासून गांडूळ खत तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यात आला होता. त्याचे तीनतेरा वाजले आहेत. आता नगरपालिका बायोगॅस, घनकचरा नियोजनासाठी काही नवीन योजना आखण्याच्या तयारीत आहे. अशा प्रकल्पांच्या अभ्यासासाठी पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष संजय कोरे, डांगे गटाचे अॅड. चिमण डांगे आणि एन. ए. गु्रपचे खंडेराव जाधव यांनी मुंबई गाठल्याचे समजते.
शहरात स्वच्छतेसाठी राबविण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा बोजवारा उडाला आहे. भुयारी गटार योजना आणि २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना फक्त कागदावरच आहे. २४ बाय ७ साठी प्राप्त झालेल्या अनुदानाची वाट फक्त सर्व्हे एजन्सीवर लावली आहे. या दोन्ही योजना रद्द झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. कचरा डेपो आणि कुंड्या कचऱ्याने भरुन वाहत आहेत. कचऱ्यापासून गांडूळ खत तयार करण्यासाठी पालिकेने कोट्यवधीचा खर्च करुन प्रकल्प उभारला, परंतु तो सध्या बंद आहे. डेपोवर नेमलेले सुरक्षा रक्षक नेहमीच गैरहजर असतात. परंतु त्यांचा पगार मात्र काढण्यात येतो.
शहरातील गांडूळ खत प्रकल्पाचे तीनतेरा वाजल्याने आमदार जयंत पाटील यांनी मुंबईत भाभा अनुसंधान केंद्रातील काही प्रकल्प पाहण्यासाठी पालिकेतील ठराविक पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले होते. यामुळेच पालिकेचे हे पदाधिकारी सोमवारी पहाटे मुंबईला मार्गस्थ झाले.
इस्लामपूर पालिकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी हे सहीपुरतेच पालिकेचे धनी आहेत. शहरातील विविध विकास कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. परंतु अंतर्गत संघर्षामुळे एकही विकासकाम शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले नाही. जी विकासकामे झाली आहेत, त्यांचा दर्जा चांगला नाही. त्यामुळे केलेल्या विकास कामांचे तीनतेरा वाजले आहेत. हीच परिस्थिती गांडूळ खत प्रकल्पाची झाली आहे. आता नव्याने सत्ताधारी यामध्ये काय नवीन करणार, याकडेच साऱ्या शहरातील सामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
डॉ. शरद काळे यांनी मुंबई येथील ‘निसर्ग ऋण प्रकल्प’ पाहणी करण्यासाठी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते. परंतु इस्लामपूर शहरातील घनकचरा प्रकल्प बंद पाडलेले पदाधिकारीच आज मुंबई येथे नवीन प्रकल्प पाहण्यासाठी गेले आहेत. खरोखरच इस्लामपूर शहराचे घनकचरा व्यवस्थापन ‘निसर्ग ऋणा’तून मुक्त व्हायचे असेल, तर सत्ताधाऱ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- विजय कुंभार,
विरोधी पक्षनेते, इ. न. पा.
जयंत पाटलांचा आदेश आणि ...
पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील हे पालिकेचा कारभार हाकत आहेत. परंतु विजय पाटील यांच्याविरोधात डांगे गट आणि एन. ए. गु्रप असे दोन गट कार्यरत आहेत. पालिकेच्या माध्यमातून शहरातील विकासकामे करताना विजय पाटील आणि अॅड. चिमण डांगे एकत्र येऊनच सर्व निर्णय घेतात. तसेच एन. ए. गु्रपचे खंडेराव जाधव अंतर्गत विरोधात असले तरी, जयंत पाटील यांच्यासमोर मात्र सर्व काही आलबेल असल्याचे दाखवितात. याच गु्रपचे संजय कोरे यांना उपनगराध्यक्षपद मिळाले आहे. परंतु त्यांनी त्यांच्या आसनाचा त्याग केला आहे. त्यामुळे पालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादीचे तीन गट कार्यरत असल्याचे नेहमीच स्पष्ट झाले आहे. तरी सुध्दा जयंत पाटील यांच्या आदेशाने सोमवारी पहाटे हे सर्व एकत्रितपणे एकाच गाडीतून मुंबईला गेले आहेत. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.