बांबवडेत आढळले बिबट्याचे तीन बछडे, वनविभागाने बछड्यांना मादी घेवून जाण्यासाठी नैसर्गिक अधिवासात ठेवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 17:28 IST2023-01-04T17:13:11+5:302023-01-04T17:28:53+5:30
हालचाली टिपण्यासाठी दोन कॅमेरेही लावले

बांबवडेत आढळले बिबट्याचे तीन बछडे, वनविभागाने बछड्यांना मादी घेवून जाण्यासाठी नैसर्गिक अधिवासात ठेवले
शिराळा : बांबवडे (ता.शिराळा) येथील खोलागिरी नावाच्या शिवारात मंगळवारी ऊसतोड कामगारांना बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. मादी या बछड्यांना नेण्यासाठी येण्याची शक्यता असल्याने वनविभागाने त्याच ठिकाणी नैसर्गिक अधिवासात हे बछडे ठेवले असून, त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी दोन कॅमेरेही लावले आहेत. एक महिन्याच्या आतील दोन नर व एक मादी असे हे बछडे आहेत.
बांबवडे येथील खोलागिरी परिसरातील कारीची पट्टी येथील भानुदास माने यांच्या शेतात मंगळवारी ऊसतोड सुरू होती. दुपारी तीन वाजण्याच्यादरम्यान एका ऊसतोड महिला कामगारास तीन बिबट्यांचे बछडे दिसले. घाबरून तिने आरडाओरडा केला. यावेळी तेथे उपस्थित नागरिक व ऊसतोड कामगारांनी ऊसतोड थांबवून त्वरित शिराळा वनक्षेत्रपाल कार्यालयास माहिती दिली.
तातडीने उपवनसंरक्षक नीता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली महांतेश बगळे, मानद वन्यजीवरक्षक अजितकुमार पाटील, वनरक्षक देविका ताहसीलदार, वनपाल चंद्रकांत देशमुख, प्रकाश पाटील, अमित कुंभार आदी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी केली तसेच बिबट्या मादी परिसरात असल्याची शक्यता वर्तविली.
ती बछड्यांना नेण्यासाठी येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी तीनही बछड्यांंना संजय माने यांच्या शेतामध्ये नैसर्गिक अधिवासामध्ये सुरक्षितपणे एका ट्रेमध्ये ठेवले. या क्षेत्राजवळ दोन कॅमेरे लावून या परिसरात टेहळणी करण्यात येत आहे.