नागजजवळ खासगी बस उलटून तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:01 AM2017-12-30T00:01:41+5:302017-12-30T00:01:52+5:30

Three killed in private bus near Nagraj | नागजजवळ खासगी बस उलटून तीन ठार

नागजजवळ खासगी बस उलटून तीन ठार

Next


ढालगाव : मिरज-पंढरपूर महामार्गावर नागज (ता. कवठेमहांकाळ) फाट्यापासून तीन किलोमीटर अंतरावर विठ्ठलवाडी पेट्रोलपंपाजवळ खासगी बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात माय-लेकासह तिघेजण जागीच ठार झाले. हीना जमीर शेख (वय ३५, रा. सोलापूर) व सुभाजिन जमीर शेख (दीड वर्ष) अशी मृत माय-लेकाची नावे आहेत. अन्य एका मृताचे नाव समजू शकले नाही. या अपघातात वीसहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री साडेसात वाजता ही घटना घडली.
दीपकराज कंपनीची खासगी बस (एमएच ०९ सीव्ही ७२७) नेहमीप्रमाणे कोल्हापूरहून सोलापूरला निघाली होती. सायंकाळी साडेसातच्या सुमारास नागज फाट्यापासून तीन किलोमीटर अंतरावर विठ्ठलवाडी गावाजवळ बसचा वेग न आवरल्याने चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याच्या पश्चिम बाजूला उलटली. अपघात इतका भीषण होता की, बसची पुढील चाके निखळून पडली. प्रवाशांमध्ये हाहाकार माजला. सर्वत्र आरडाओरड व प्रवाशांचे विव्हळणे सुरू झाले. अपघातात हीना जमीर शेख व सुभाजिन जमीर शेख या माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला. आणखी एका मृत व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. मृत व जखमींना तातडीने आपत्कालीन रुग्णवाहिकेतून मिरज शासकीय रुग्णालयात, तसेच सांगोला येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी बसचालक सतीश मोतीराम चोरगे (३८, रा. मोहोळ, जि. सोलापूर), रजाक अमीन मोमीन (४६), नजमा रजाक सय्यद (४०), प्रवीण शिंदे (३५, रा. वाटंबरे), सनजीत देवरी (१९, रा. कागल) यांच्यावर मिरज शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर जखमींची नावे समजू शकली नाहीत.
दीपकराज ट्रॅव्हल्स कंपनीची बस ही दररोज कोल्हापूर-सोलापूर महामार्गावर प्रवास करते. सायंकाळी कोल्हापूरहून सोलापूरला निघते व दुसºया दिवशी सकाळी सोलापूरहून कोल्हापूरला जाते. एसटी महामंडळाप्रमाणे ही खासगी बस कोल्हापूर-सोलापूर महामार्गावरून प्रत्येक थांब्यावर वडापप्रमाणे वाहतूक करते. आजही नेहमीप्रमाणे ती कोल्हापूरपासून वडाप करीत आली होती. त्यामुळे या बसमध्ये कोणते प्रवासी कोठे बसले होते, याची माहिती कळू शकली नाही. बसमधून वडाप सुरू असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष कसे झाले? याची चौकशी करावी, अशी मागणी लोकांनी केली आहे. पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, उपनिरीक्षक सचिन वसमाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना उपचारासाठी पाठविले. नागजचे पोलीसपाटील दीपक शिंदे व तानाजी शिंदे यांनी जखमींना पाठविण्यासाठी मदत केली.

Web Title: Three killed in private bus near Nagraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.