सांगलीत नदीकाठी भिंतींचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:30 IST2021-08-22T04:30:17+5:302021-08-22T04:30:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोल्हापुरातील पंचगंगेचे पाणी थेट कालव्याद्वारे राजापूर बंधाऱ्याखाली सोडता येईल काय, याचा विचार करण्याची सूचना ...

सांगलीत नदीकाठी भिंतींचा विचार
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोल्हापुरातील पंचगंगेचे पाणी थेट कालव्याद्वारे राजापूर बंधाऱ्याखाली सोडता येईल काय, याचा विचार करण्याची सूचना अभियंत्यांना दिली आहे. सांगलीत पुराचे पाणी शहरात शिरणाऱ्या ठिकाणी भिंती बांधण्याचाही विचार आहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी येथे केले. पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित पूर परिषदेत ते बोलत होते.
‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, वडनेरे समितीचे सदस्य राजेंद्र पवार, मयूरेश प्रभुणे, प्रमोद चौगुले या वक्त्यांसह कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आ. विक्रम सावंत, आ. सुधीर गाडगीळ यावेळी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले की,
२०५५
पासून प्रत्येक वेळेस आलेला पूर वेगळा आहे. त्यामुळे एखादी उपाययोजना कायमस्वरूपी लागू होईल, हे निश्चित नाही. पूरप्रवण भागातील रहिवाशांना वेळेत कळवून बाहेर काढणे, हा एक मार्ग आहे. त्यांचे पुनर्वसन शक्य नाही. नवी जमीन घ्यायला गेल्यास तेथील लोकांचा विरोध होतो. २००५ च्या महापुरानंतर सोनिया गांधी येऊन गेल्या. त्यानंतर पुनर्वसनाच्या घोषणा झाल्या, पण कार्यवाही शक्य झाली नाही.
ते म्हणाले की, अतिवृष्टीमध्ये पाण्यावर नियंत्रण राहत नाही. प्रत्यक्ष पडलेल्या पावसाची माहिती देणारी यंत्रणा आपल्याकडे आहे. तशी यंत्रणा कर्नाटकात अलमट्टीपर्यंत बसविण्याची विनंती त्या सरकारला केली आहे. त्यांनी मान्यही केले आहे. यंदा पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व सरपंचांना गावे रिकामी करायला सांगितली. त्यामुळे जीव वाचले. कोयना धरणात २४ तासांत १६.५० टीएमसी पाणी आले. प्रचंड पावसामुळे कोल्हापूरचे पंचगंगेचे पाणी वळवणे, कालवा काढून राजापूर बंधाऱ्यात सोडणे, या पर्यायांचा विचार सुरू आहे. तशा सूचना कोल्हापूरच्या अभियंत्यांना दिल्या आहेत. भीमा खोऱ्यात पाणी वळवणे हे लांब पल्ल्याच्या कामाचे नियोजन आहे. मानवाची शर्यत संकटाबरोबर आहे. अचूक अंदाज व लोकांचे पूरकाळात स्थलांतर याची गरज आहे. हा विषय राजकीय नाही. दूरगामी विचार करायला हवा. जमिनीवरचे शक्य तितके काम आपण करू या. मोठमोठी यंत्रे आल्यापासून विध्वंस वाढला. पुरामुळे कृष्णाकाठच्या संस्कृतीवर परिणाम होईल. सरकारने संवेदनशीलतेने सूचना ऐकून मार्ग काढायला हवेत.
ते म्हणाले की, रस्ते, पूल बांधताना बांधकाम विभागाने पुराचा विचार करायला हवा. सुदैवाने मोठ्या पुरातही कृष्णेने दिशा बदललेली नाही. कृष्णा का रुसते, आकांडतांडव करते, याचा विचार व्हावा. आम्ही कायदे करतो, पण रस्त्यावर अंमलबजावणी करण्यात अडचणी येतात. प्लास्टिकचा वापर, अतिक्रमणे यांचा विचार लोकांनीही करावा. लवकरच नंदकुमार वडनेरेंसोबत बैठक घेणार असून शेजारील देशांच्या कायद्यांचा विचार करणार आहे.
चौकट
नदीकाठी भिंती हा व्यवहार्य मार्ग
पाटील म्हणाले की, सांगलीत शिरणारे पाणी भिंती बांधून अडवणे हा एक मार्ग आहे. पाणी शिरणारे मार्ग शोधायला अभियंत्यांना सांगितले आहे. पॅरिसमध्ये संपूर्ण नदीला दोन्ही बाजूंनी भिंत बांधली आहे. त्यामुळे हा मार्ग व्यवहार्य आहे. शहरात किती फुटाला कोठे पाणी येईल, याचे नकाशे दिले आहेत.
चौकट
‘लोकमत’चे लेख मुख्यमंत्र्यांना दिले
डॉ. विश्वजित कदम म्हणाले की, ‘लोकमत’मध्ये महापुराविषयी आलेल्या लेखांची कात्रणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहेत. ते वाचून पूरस्थिती समजून घेण्याची विनंती केली आहे.