The thoughts of Anna brothers should awaken in the birthday | अण्णा भाऊंच्या विचारांचा जन्मशताब्दीत जागर व्हावा -- सतीश चौगुले
अण्णा भाऊंच्या विचारांचा जन्मशताब्दीत जागर व्हावा -- सतीश चौगुले

ठळक मुद्दे--चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद शासनाकडून शंभर कोटींचा विशेष निधी

युनुस शेख।

संयुक्त महाराष्ट्राची हाक राज्यभर पोहोचविणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती १ आॅगस्ट रोजी साजरी झाली. लोकशाहीर अण्णा भाऊंचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने अण्णा भाऊंचे स्मारक उभारण्याची घोषणा सरकारने केली आहे, तसेच अण्णा भाऊंच्या कार्याची आजच्या पिढीला ओळख व्हावी, म्हणून जन्मशताब्दी वर्षात विविध उपक्रमांसाठी तब्बल शंभर कोटीची घोषणा करण्यात आली आहे. यानिमित्ताने अण्णा भाऊंच्या विचारांचा जागर व्हावा, अशी अपेक्षा इस्लामपूर येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जीवनचरित्र व साहित्याचे अभ्यासक सतीश चौगुले यांनी व्यक्त केली.

प्रश्न : राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभे करण्याची घोषणा केली आहे. या स्मारकात काय अपेक्षित असावे?

उत्तर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे ही एक व्यक्ती नसून, तो वंचित-उपेक्षित, कष्टकऱ्यांचा हुंकार आणि विचार आहे. त्यादृष्टीने अण्णा भाऊ ज्या मुद्द्यावर लढले त्यावर प्रकाशझोत पडला पाहिजे. त्यांनी अंधश्रद्धेवर केलेला प्रहार, स्वातंत्र्य लढ्यासह संयुक्त महाराष्टÑाच्या चळवळीत जे अतुलनीय कार्य केले, ते पुन्हा समाजासमोर आले पाहिजे. उपेक्षित समाजातील विद्यार्थ्यांना प्रस्थापित वर्गाबरोबर आणण्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र, गं्रथालय, अभ्यासिका अशी प्रेरणा देणारी व्यवस्था स्मारकात असावी.

प्रश्न : आजच्या वातावरणात अण्णा भाऊंच्या साहित्याची कशी गरज आहे?
उत्तर : देश आणि राज्यात सध्या असलेल्या वातावरणावर मात करण्यासाठी अण्णा भाऊंचे साहित्य हेच उत्तर आहे. अण्णा भाऊ जगले तो काळ आणि आजचा काळ सारखाच आहे. पूर्वी ते ब्रिटिशांविरोधात लढले, भांडवलदारांची गुलामगिरी होती, आता जाती-धर्माच्या नावाखाली धर्मांध शक्तींची गुलामगिरी करावी लागत आहे. या सर्व प्रश्नांशी लढण्यासाठी अण्णा भाऊंच्या साहित्याचा हुंकार उमटणे महत्त्वाचे ठरते.

  • साहित्याचे पुनर्मुद्रण करा

अण्णा भाऊ साठे यांनी साहित्य क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. एक तर अण्णा भाऊंचे साहित्य वेगवेगळ्या भाषांमध्ये असून, ते दुर्मिळ झाले आहे. मराठीतील त्यांच्या साहित्याचे पुनर्मुद्रण करून ते नव्या पिढीसाठी उपलब्ध करून दिले पाहिजे. तसेच विविध देशांच्या राजदूतांमार्फत त्या-त्या देशांच्या भाषांमध्ये हे साहित्य अनुवादित केल्यास भारतासाठी ती अभिमानाची बाब ठरेल. अण्णा भाऊंवर डॉक्युमेंटरीसुद्धा केली पाहिजे.
 

  • वाटेगावात स्मारक हवे

वाटेगावमधील पत्र्याचे शेड हे स्मारक होऊच शकत नाही. ज्या अण्णा भाऊंनी स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्टÑ चळवळीत भाग घेतला; त्यांच्या साहित्यामधून माणसाला उभा राहण्याची ताकद मिळाली. त्यामुळे शासनाने ५० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे, त्याला कृतीची जोड देऊन अण्णा भाऊंचा उचित सन्मान होईल, असे प्रेरणादायी स्मारक उभे करायला हवे.

Web Title: The thoughts of Anna brothers should awaken in the birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.