या बैल जोडीने सर्वात मोठे मैदान मारले, फॉर्च्यूनर पटकावली; चंद्रहार पाटलांनी पुढच्या वर्षीसाठी 'बीएमडब्लू' ची घोषणा केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 23:54 IST2025-11-09T23:47:43+5:302025-11-09T23:54:18+5:30
महिला बैलगाडा शर्यत हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. आता 100 महिलांना गोवंश संवर्धनासाठी गायी दिल्या जाणार आहेत.

या बैल जोडीने सर्वात मोठे मैदान मारले, फॉर्च्यूनर पटकावली; चंद्रहार पाटलांनी पुढच्या वर्षीसाठी 'बीएमडब्लू' ची घोषणा केली
राज्यातील सर्वात मोठ्या बैडगाडा शर्यतीचे आयोजन सांगली जिल्ह्यातील बोरगाव येथे करण्यात आले होते. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत पहिल्या नंबर पटकावणाऱ्याला फॉर्च्युनर ही गाडी बक्षिस म्हणून ठेवण्यात आली होती. तसेच थार ही गाडी आणि अनेक दोन चाकी गाड्यांचा बक्षिसांमध्ये समावेश करण्यात आला होता. या स्पर्धा पाहण्यासाठी राज्यातील हजारो बैलगाडा प्रेमी सांगलीत उपस्थित होते. या स्पर्धेत 'हेलिकॉप्टर बैज्या व ब्रेक फेल' या बैलजोडीने विजय मिळवला. मानाची फॉर्च्युनर पटकावली आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, माजी आमदार शहाजीबापू पाटील तसेच अन्य नेत्यांची उपस्थिती होती. देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचे मैदान हेलिकॉप्टर बैज्या व ब्रेक फेल बैलजोडीने मारले आहे. ही बैलजोडी श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीची मानकरी ठरली आहे. कोल्हापूरच्या शिरोळचे बाळू दादा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैज्या आणि सांगलीच्या भिलवडी येथील पाटील डेअरीचा ब्रेक फेल बैलजोडीने फॉर्च्युनर गाडी जिंकली आहे.
पुढच्या स्पर्धेला बीएमडब्लू गाडी असणार
महिला बैलगाडा शर्यत हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. आता 100 महिलांना गोवंश संवर्धनासाठी गायी दिल्या जाणार आहेत. तसेच विजेत्यांसाठी थार, फॉर्च्युनर, 150 टू-व्हीलर आणि ट्रॅक्टर अशा कोट्यवधी रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती. यातील मानाची फॉर्च्युनर हेलिकॉप्टर बैज्या व ब्रेक फेल बैलजोडीने पटकावली आहे. तसेच पुढच्या बैलगाडी शर्यतीसाठी बीएमडब्ल्यू गाडी बक्षिस म्हणून असणार असल्याचे चंद्रहार पाटील यांनी जाहीर केले.