चोर समजून दोघांना बेदम चोपले
By Admin | Updated: July 19, 2015 00:41 IST2015-07-19T00:39:38+5:302015-07-19T00:41:03+5:30
कामेरीजवळील घटना : जखमी एकजण गुन्हेगारी प्रवृत्तीचा

चोर समजून दोघांना बेदम चोपले
इस्लामपूर : कऱ्हाड-तासगाव रस्त्यावरील दुधारी (ता. वाळवा) गावच्या हद्दीतील पेट्रोल पंपावर १५०० रुपयांचे डिझेल भरून त्याने पैसे न देताच पलायन करणाऱ्या टेम्पोचालकासह अन्य एकास कामेरी येथे रात्रगस्त घालणाऱ्या जमावाने रात्री साडेआठच्या सुमारास बेदम मारहाण केली. दुधारीपासून पाठलाग करणाऱ्या दोघांनी चोर-चोर असे म्हटल्याने हा पैसे बुडवून पळणारा टेम्पोचालक रात्रगस्तीच्या जमावाच्या तावडीत सापडला.
दीपक सोपान कुंभार (वय ३१, रा. रेठरेहरणाक्ष) आणि हणमंत पाटील (वय ६२, रा. बोरगाव) अशी जखमींची नावे आहेत. दरम्यान, पोलिसांनी दोघांना मारहाण करणाऱ्या चौघा अज्ञातांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंद केला आहे. याबाबत अप्पर पोलीसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील यांनी या घटनेची वस्तुस्थिती पत्रकारांना सांगितली.
ते म्हणाले, दीपक कुंभार हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध मारहाण, महिलेचा छळ, बेकायदा हत्यार बाळगणे अशा स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. शुक्रवारी सायंकाळी तो आपला टेम्पो (क्र. एमएच १०, एक्यू ९४९३) घेऊन इस्लामपूरहून बोरगावकडे गेला. बोरगाव येथे मित्र हणमंत पाटील यांना डिझेल टाकायचे आहे म्हणून सोबत घेतले. दुधारीजवळील पंपावर १५०० रुपयांचे डिझेल भरले आणि तेथून पैसे न देताच वाहन घेऊन त्याने पलायन केले.
या घटनेनंतर पंपावरील दोघा कर्मचाऱ्यांनी मोटारसायकलवरून दीपक कुंभार याचा पाठलाग केला. मात्र त्याने दाद दिली नाही. इस्लामपूर शहरातून त्याने मधल्या मार्गाने कामेरीचा रस्ता पकडला. दरम्यान, कामेरी गावाजवळील दत्तनगर परिसरात रात्रगस्त घालणारे युवक दिसल्यावर पाठीमागून टेम्पोचा पाठलाग करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ‘चोर-चोर’ अशी आरोळी ठोकली. त्यावरून रात्रगस्त घालणाऱ्या युवकांनी दीपक कुंभार याला पाठलाग अडवून मारहाण केली.
मात्र हणमंत पाटील यांच्याकडे चौकशी केल्यावर खरा प्रकार उघड झाल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)