Sangli: तासगाव नगरपालिकेच्या पटावर रंगणार तिरंगी सामना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 19:17 IST2025-11-05T19:17:22+5:302025-11-05T19:17:49+5:30
Local Body Election: नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची उत्सुकता, मनोमिलनाची चर्चा गुंडाळणार; थेट मैदानात लढत

Sangli: तासगाव नगरपालिकेच्या पटावर रंगणार तिरंगी सामना
दत्ता पाटील
तासगाव : तासगाव नगरपालिकेच्या १२ प्रभागांसाठी २४ नगगसेवक व १ नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागणार आहेत. शहरातील आणि तालुक्यातील एकंदरीत राजकीय वाटचाल पाहिल्यानंतर आबा-काका गटाच्या मनोमिलनाची चर्चा भाषणातच गुंडाळली जाणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तासगाव नगरपालिकेत तिरंगी लढत होईल, अशी शक्यता आहे.
तासगाव नगरपालिकेची २०१६ साली भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असा तिरंगी सामना झाला होता. या लढतीत माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपला सत्ता मिळाली होती. काँग्रेसच्या उमेदवारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा निसटता पराभव झाला होता. मागील सात वर्षांत, विशेषतः गेल्या काही महिन्यांत, तासगावच्या राजकीय वर्तुळात मोठा उलटफेर झाला आहे.
भाजपमध्ये असलेले संजय पाटील राष्ट्रवादीत गेले आणि त्यानंतर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांची संजय पाटील यांच्याशी सलगी वाढली आहे, तर भाजपने संजयकाकांशिवाय अस्तित्व दाखवून देण्याची तयारी सुरू केली आहे.
त्यामुळे, एकंदरीत बदललेल्या राजकीय परिस्थितीतून तासगाव नगरपालिकेसाठी आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष), तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील आणि संदीप गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली भाजप, तर माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकास आघाडी—अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता सध्या तरी दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत शहराच्या राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथी झाल्याचे देखील पाहायला मिळेल, अशी शक्यता आहे.
नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची उत्सुकता
संजयकाका गटाकडून माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या पत्नीची उमेदवारी प्रबळ मानली जात आहे. तर रोहित पाटील यांच्या पक्षाकडून माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे यांच्या पत्नीची दावेदारी मजबूत मानली जात आहे. भाजपकडून शहराध्यक्ष सागर चव्हाण यांच्या पत्नीची उमेदवारी प्रबळ मानली जात आहे. नगराध्यक्षाच्या उमेदवारीवरच अनेक राजकीय समीकरणे निश्चित होणार आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता आहे.
२०१६ चे पक्षीय बलाबल -
भाजप - थेट नगराध्यक्ष, १३ नगसेवक
राष्ट्रवादी - ८ नगसेवक