राज्यात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्यावी, चंद्रहार पाटील यांची मागणी; आझाद मैदानात उपोषणाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 20:20 IST2025-09-12T20:19:59+5:302025-09-12T20:20:33+5:30
वर्षभरात तीन ते चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहेत. त्यामुळे कुस्ती विश्वात संभ्रमाचे वातावरण

राज्यात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्यावी, चंद्रहार पाटील यांची मागणी; आझाद मैदानात उपोषणाचा इशारा
विटा : राज्यातील सर्वोच्च मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबत आता वाद निर्माण झाला आहे. १९६० पासून एकमेव सर्वोच्च स्पर्धा म्हणून महाराष्ट्र केसरी स्वीकारली जात होती. मात्र, आता संघटनेमधील मतभेद, श्रेयवाद आणि राजकीय हस्तक्षेपामुळे वर्षभरात तीन ते चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहेत. त्यामुळे कुस्ती विश्वात संभ्रमाचे वातावरण असून, कुस्तीगिरांची हेळसांड होत आहे. या पार्श्वभूमीवर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शासनाकडे एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हावी, अशी मागणी केली असून, तोडगा न निघाल्यास मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
चंद्रहार पाटील म्हणाले, महाराष्ट्र केसरी किताबासाठी अनेक स्पर्धा झाल्यामुळे खरा महाराष्ट्र केसरी कोण हेच लोकांना उमगत नाही. त्यामुळे या किताबाची प्रतिष्ठा व किंमत कमी होत आहे. गेल्या वर्षी निवडणुकीमुळे २०२४ मधील स्पर्धा पुढे ढकलल्या. परिणामी २०२५ मध्ये दोन स्पर्धा झाल्या. यंदा नोव्हेंबरमध्ये पुन्हा दोन स्पर्धा होणार आहेत. आणखी एका संघटनेचाही उदय झाल्याचे समजते. अशा परिस्थितीत एका वर्षात पाच महाराष्ट्र केसरी तयार होत असून, हा प्रकार राज्यातील कुस्ती परंपरेला धोका निर्माण करणारा आहे. त्यामुळे शासनाने या स्थितीवर तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.
आंदोलनाचा पावित्रा
चंद्रहार पाटील यांनी यापूर्वी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण केले होते, तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना भेटून एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याची मागणी केली होती. मात्र, अजून कोणताही निर्णय न झाल्याने त्यांनी आता निर्णायक आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
आमचा कोणत्याही कुस्तीगीर संघटनेला विरोध नाही. मात्र, दरवर्षी फक्त एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे, हीच आमची एकमेव मागणी आहे. - पै. चंद्रहार पाटील, डबल महाराष्ट्र केसरी, विटा