खाद्यतेलांचा छोटा पॅक, बडा धमाका; ग्राहकांची अप्रत्यक्ष फसवणूक

By संतोष भिसे | Updated: June 30, 2025 18:52 IST2025-06-30T18:51:33+5:302025-06-30T18:52:25+5:30

वजन व किमतीही गोंधळात टाकणाऱ्या

The weight of bags began to decrease due to commercial competition from oil companies | खाद्यतेलांचा छोटा पॅक, बडा धमाका; ग्राहकांची अप्रत्यक्ष फसवणूक

खाद्यतेलांचा छोटा पॅक, बडा धमाका; ग्राहकांची अप्रत्यक्ष फसवणूक

संतोष भिसे

सांगली : वाढत्या किंमतीमुळे खप कमी होऊ लागल्याने बिस्किट कंपन्यांनी पुड्यातील बिस्कटांची संख्या कमी केली. हीच क्लृप्ती आता खाद्यतेल कंपन्यांनीही वापरायला सुरुवात केली आहे. किमतीत फारशी वाढ न करता तेलाच्या पिशवीचे वजन मात्र कमी करायला सुरुवात केली आहे. सध्या बाजारात अर्धा, एक किलोएवजी वेगवेगळ्या वजनांच्या पिशव्या मिळत आहेत. यातून ग्राहकांची अप्रत्यक्ष फसवणूक सुरू आहे.

तेल कंपन्यांच्या व्यावसायिक स्पर्धेतून पिशव्यांचे वजन कमी होऊ लागले आहे. एरवी पाव किलो, अर्धा किलो, एक किलोची पिशवी घेण्याची सवय असलेल्या ग्राहकांना आता ८७० ग्रॅम, ७४० ग्रॅम, ४३० ग्रॅम, अशा वेगवेगळ्या व गोंधळात टाकणाऱ्या वजनाचे पाऊच घ्यावे लागत आहेत. वजनानुसार वेगवेगळ्या कंपन्यांच्या दराची तुलना करून स्वस्त तेल कोणते याचा निर्णय घेता येत होता. पण, सध्या सर्वच कंपन्यांनी ग्राहकांत गोंधळ निर्माण करणारे वेगवेगळ्या वजनाचे पाऊच बाजारात आणले आहेत. दर तोच, वजन मात्र कमी, असे चित्र आहे.

वजन व किमतीही गोंधळात टाकणाऱ्या

सध्या एका कंपनीचा राइस ब्रॅण्डचा खाद्यतेलाचा ८७० ग्रॅमचा पाऊच १५२ रुपयांना घ्यावा लागतो. सरकी तेलाची ८५० ग्रामची पिशवी १२८ रुपयांना उपलब्ध आहे. एका कंपनीचे एक लिटर शेंगदाणा तेल १५८ रुपयांना विकले जाते. सोयाबीनची ८५० ग्रामची पिशवी १२२ रुपयांना मिळते. एका कंपनीची ८७० ग्रॅम वजनाची तेलाची पिशवी १४१ रुपयांना आहे. हे वजन आणि किंमत ग्राहकांना गोंधळात टाकत आहे.

शासनाने गतवर्षापासून स्टॅण्डर्ड पॅकिंगची अट रद्द केली आहे. त्यामुळे अशा वेगवेगळ्या वजनांची पॅकिंग बाजारात येत आहेत. त्यावर प्रतिग्रॅम किंवा प्रतिमिली किंमत लिहिण्याचा नियम केला आहे. यातून ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्राहकांनी प्रतिग्रॅम किंवा प्रतिमिली दर पाहूनच वस्तूची किंमत निश्चित करावी व खरेदी करावी. - दत्तात्रय पवार, उपनियंत्रक, वजन-मापे विभाग

Web Title: The weight of bags began to decrease due to commercial competition from oil companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली