..त्यामुळे 'शिंदे मंत्रिमंडळ' विस्ताराची घोषणा करत नाहीत- जयंत पाटील
By शीतल पाटील | Updated: October 28, 2022 19:07 IST2022-10-28T19:05:52+5:302022-10-28T19:07:24+5:30
उपमुख्यमंत्री फडणवीस विस्तार होणार असल्याचे सांगत आहेत. पण तो अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. एकनाथ शिंदे घोषणा करतील, तेव्हाच ती खरी म्हणावी लागेल

..त्यामुळे 'शिंदे मंत्रिमंडळ' विस्ताराची घोषणा करत नाहीत- जयंत पाटील
सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील प्रत्येकाला मंत्री व्हायचे आहे. त्यासाठी शिंदे मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा करत नाहीत. देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेला अर्थ नाही. मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेकजण निघून जातील, अशी भीती शिंदे गटाला आहे, अशी गुगली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत टाकली.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री फडणवीस विस्तार होणार असल्याचे सांगत आहेत. पण तो अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. एकनाथ शिंदे घोषणा करतील, तेव्हाच ती खरी म्हणावी लागेल. दुसरीकडे मात्र मंत्रिमंडळातील अनेक निर्णय फडणवीसच घेत असतात. शिंदे गटातील प्रत्येकाला मंत्री व्हायचे आहे. तसे न झाल्यास आमदार आता उद्धव ठाकरेंकडे परत जातील, अशी भीती आहे. शिंदे गटाचे संख्याबळ ३४ पेक्षा कमी झाल्यास राज्य सरकारवर संकट येऊ शकते. त्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार लांबविला जात आहे.
ते म्हणाले की, राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राष्ट्रवादीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. फाॅक्सकॉनपाठोपाठ आता टाटा एअरबसचा प्रकल्पही महाराष्ट्रातून गुजरातला गेला. तरीही राज्याचे प्रमुख काहीच हालचाल करताना दिसत नाहीत. शिंदे सरकारकडून बेरोजगारांची निराशा झाली आहे. हे उद्योगधंदे टिकविण्याची जबाबदारी सरकारची होती. पण त्यात ते सपशेल अपयशी ठरले आहेत.
रवी राणांना ऊर्जा कुणाची?
रवी राणा आणि बच्चू कडू वादाबाबत पाटील म्हणाले की, बच्चू कडूंना मी चांगले ओळखतो. तथ्यहीन आरोप होत असतील तर ते स्वस्थ बसणार नाहीत. अजूनही ते स्वस्थ का बसले आहेत, हे कळत नाही. शिंदे गटातील सर्वांनाच खोके चिकटले आहे. लोकांत बदनामी झाली आहे. भविष्यात त्यांनी वेगळी भूमिका घेतली तर आश्चर्य वाटणार नाही. पण आमदार रवी राणांना कोण ऊर्जा देत आहे?