सांगलीत पत्ता विचारणाऱ्याला मारहाण करून लुटले, दोघे जेरबंद
By शीतल पाटील | Updated: August 21, 2023 15:40 IST2023-08-21T15:39:44+5:302023-08-21T15:40:12+5:30
पोलीस गस्त घालत असताना दोघे संशयित मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

सांगलीत पत्ता विचारणाऱ्याला मारहाण करून लुटले, दोघे जेरबंद
सांगली : पत्ता विचारणाऱ्याला मारहाण करुन त्याच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम लुटण्यात आली. या जबरी चोरीप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मलीक दस्तगीर मुलाणी (वय २८ रा. इदगाह मैदान समोर, सांगली ) आणि चंदु शोभा मुरमन (वय २२, रा. गांधी पोलीस चौकीसमोर, मिरज ) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत सक्षम चंद्रकांत यादव (रा. विटा, ता. खानापूर) याने फिर्याद दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवार २० रोजी रात्रीच्या सुमारास शहरातील टिंबर एरिया मार्गे सक्षम यादव मित्रासह परगावी निघाला होता. यावेळी संशयित एका चौकात थांबले होते. सक्षम पत्ता विचारण्यासाठी त्यांच्याकडे गेला. त्यावेळी संशयितांनी सक्षमला लाथा बुक्कयांनी मारहाण केली. त्याच्या खिशातील मोबाईल आणि रोख रक्कम काढून घेवून पलायन केले. सक्षम यादव यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
दरम्यान पोलीस गस्त घालत असताना दोघे संशयित मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरलेला ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. यातील मलिक मुलाणी याच्यावर जबरी चोरी, मारहाण आदि गुन्हे दाखल असून तो रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहे.