टीईटी परीक्षेत उत्तीर्ण करून देण्याचे आमिष, गैरव्यवहाराच्या बंदोबस्ताची स्वतंत्र भारत पक्षाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 18:13 IST2025-10-28T18:12:33+5:302025-10-28T18:13:05+5:30
सांगली : शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानेच तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे ही ...

टीईटी परीक्षेत उत्तीर्ण करून देण्याचे आमिष, गैरव्यवहाराच्या बंदोबस्ताची स्वतंत्र भारत पक्षाची मागणी
सांगली : शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानेच तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी गैरव्यवहाराची शक्यता आहे. प्रशासनाने याबाबत काटेकोर खबरदारी घ्यावी अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केली आहे.
त्यांनी मुख्यमंत्री तसेच शिक्षणमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांची पात्रता निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळा, माध्यमिक, प्राथमिक अनुदानित शाळा, आश्रमशाळा येथे शिकविणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) उत्तीर्ण होणे सक्तीचे केले आहे. सेवेत असलेल्या शिक्षकांनाही ती द्यावी लागणार आहे.
या पार्श्वभूमीवर ही परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी जिल्ह्यात दलाल सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. उत्तीर्ण करून देण्यासाठी मोठ्या रकमेचे आमिषही दाखविण्यात आल्याची चर्चा आहे. परिणामी गैरव्यवहारांची शक्यता जास्त आहे. याबाबत शासनाने खबरदारी घेण्याची गरज आहे.