सांगलीत लोकसभा निकालापूर्वीच महायुती अन् महाविकास आघाडीत नेत्यांच्या कुरघोडी

By हणमंत पाटील | Published: May 25, 2024 05:22 PM2024-05-25T17:22:49+5:302024-05-25T17:23:36+5:30

विधानसभेतील प्रतिस्पर्धी लक्ष : गद्दारी व विरोधकांना छुप्या मदतीचे आरोप

the leaders of the Mahayuti and Mahavikas Aghadi were in a quandary Even before the Lok Sabha result in Sangli | सांगलीत लोकसभा निकालापूर्वीच महायुती अन् महाविकास आघाडीत नेत्यांच्या कुरघोडी

सांगलीत लोकसभा निकालापूर्वीच महायुती अन् महाविकास आघाडीत नेत्यांच्या कुरघोडी

हणमंत पाटील

सांगली : लोकसभा निवडणुकीचा निकाल जवळ येऊ लागल्याने बंडखोरी व गद्दारी केलेल्या नेत्यांकडून कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. महाविकास आघाडी अथवा महायुतीचा उमेदवार पराभूत झाला, तर त्याचे खापर आपल्या डोक्यावर नको यासाठी प्रत्येक नेत्याने सहकारी नेत्यांवर चिखलफेक सुरू केलीय. आपल्या पक्षातील विधानसभेसाठी प्रतिस्पर्धी असल्याने विरोधकाला कशी छुपी मदत केली, कशी गद्दारी केली, या आरोपांची राळ उडवून जबाबदारी झटकण्याचा केविलवाणा प्रयत्न आघाडी व महायुतीतील नेत्यांकडून सुरू आहे.

सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना विशाल पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आली. उद्धवसेनेचा जिल्ह्यात एकही आमदार, जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक नसतानाही दुहेरी महाराष्ट्र केसरी पहिलवान चंद्रहार पाटील यांना महाविकास आघाडीची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांनी आघाडीधर्म पाळण्यासाठी केवळ व्यासपीठावर उपस्थितीची औपचारिकता दाखविली. मात्र, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उघडपणे विशाल पाटील यांचे काम केले.

निवडणुकीनंतर २० मे रोजी प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदम, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील व विशाल पाटील यांच्या उपस्थितीत स्नेहभोजन मेळावा सोमवारी झाला. त्यावरून उद्धवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी काँग्रेसचा स्नेहभोजन मेळावा हा गद्दारीचा पुरावा असून, काँग्रेसने शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील व बंडखोर विशाल पाटील यांच्यावर पक्षाने कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, आम्ही आघाडी धर्म पाळला असल्याची सारवासारव पृथ्वीराज पाटील यांनी केली.

दरम्यान, महायुतीच्या वतीने खासदार संजय पाटील व जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी महायुतीचे काम केले नसल्याच्या आरोपाची चौकशी करणार असल्याचे निशिकांत पाटील यांनी सांगितले. मात्र, याच निशिकांत पाटील यांनी हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार राजू शेट्टी यांना मदत केल्याचा आरोप भाजपचे जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक व शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी निशिकांत पाटील यांचे समर्थक पुढे आले आहेत. अशा पद्धतीने महाविकास आघाडी व महायुतीतील राजकीय नेत्यांनी विधानसभा डोळ्यापुढे ठेवून एकमेकांवर अपयशाचे खापर फोडण्यास निवडणूक निकालापूर्वीच सुरुवात केली. सांगली व हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघात नेत्यांच्या पक्षांतर्गत कुरघोड्या सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

विधानसभेच्या समीकरणासाठी धडपड..

लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच विधानसभेची राजकीय समीकरणे जुळविण्यासाठी कुरघोडी सुरू आहे. सांगली विधानसभेसाठी काँग्रेसमधून दावा करणारे पृथ्वीराज पाटील यांनी कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजन मेळावा घेतला. त्याला या विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या गटाची अनुपस्थिती होती. असेच राजकारण भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. या मतदारसंघात इच्छुक असलेल्या राहुल महाडिक यांनी निशिकांत पाटील यांच्यावर गद्दारीचा ठपका ठेवला आहे. लोकसभेतील कामगिरीवरून विधानसभेची उमेदवारी ठरणार आहे. त्यामुळे एकमेकांना टार्गेट करीत प्रत्येकाकडून विधानसभेची समीकरणे जुळविण्यासाठी धडपड सुरू आहे.

Web Title: the leaders of the Mahayuti and Mahavikas Aghadi were in a quandary Even before the Lok Sabha result in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.