बरगे मोडले, नियोजन कोलमडले...कृष्णेच्या पात्रातील सारे पाणी पळाले; सांगलीत पाणीटंचाई कायम
By अविनाश कोळी | Updated: March 11, 2023 19:08 IST2023-03-11T19:07:14+5:302023-03-11T19:08:47+5:30
महापालिकेचे नदीपात्रातील इंटकवेल उघडे पडले

बरगे मोडले, नियोजन कोलमडले...कृष्णेच्या पात्रातील सारे पाणी पळाले; सांगलीत पाणीटंचाई कायम
सांगली : उन्हाळ्याच्या तोंडावर दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत असतानाही पाटबंधारे विभागाने ऐन टंचाई काळातच बरगे काढल्यामुळे नदीपात्रात पाणी थांबण्याऐवजी वाहून जात आहे. त्यामुळे महापालिकेचे नदीपात्रातील इंटकवेल उघडे पडले आहेत. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला असून, सांगली व कुपवाड या दोन्ही शहरांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
सांगलीतील कृष्णा नदीतील बंधाऱ्याचे जुने लाकडी बरगे पाटबंधारे विभागाने काढले आहेत. बरगे काढल्यानेे पात्रातील पाणी हरिपूरच्या दिशेने वाहून गेले. आयर्विन पुलापासून जॅकवेलपर्यंतच्या पात्रातील पाणीही घटल्याने महापालिकेचे दोन इंटकवेल उघडे पडले आहेत. त्यामुळे महापालिकेचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सांगलीत नदीतील बंधाऱ्याला पूर्वीपासून लाकडी बरगे होते. ते खराब झाल्याचे सांगत पाटबंधारे विभागाने ते काढून टाकले आहेत.
आता बंधाऱ्याची डागडुजी व नव्याने बरगे बसविण्याबाबतचे काम हाती घेतले आहे. हे काम अत्यंत मंदगतीने सुरू आहे. हिवाळ्यातच हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर ज्यावेळी पाण्याची मागणी वाढते व नदीपात्रातील पाणीपातळी घटते अशावेळी बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे अजूनही बरगे नसल्याने नदीपात्रातून पाणी वाहून जात आहे. शनिवारीही दिवसभर लाखो लिटर पाणी वाहून गेले. त्यामुळे महापालिकेचे इंटकवेल शनिवारीही उघडेच राहिले.