सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीची आम्ही तयारी सुरू केली आहे. जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील या भाजपमध्ये आल्यामुळे आमची ताकद वाढली आहे. महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार असून, महायुतीचे ६० ते ६५ नगरसवेक विजयी होतील. महापालिकेची निवडणूक आम्हीच जिंकू, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. सांगली महापालिकेच्या नवीन इमारतीचे निवडणुकीपूर्वी भूमिपूजन करण्याचा प्रयत्न राहिल, असेही त्यांनी स्पष्ट केले.सांगलीतील स्टेशन चौकातील माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मारकास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, जनसुराज्य पक्षाचे नेते समित कदम, जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत ६० ते ६५ नगरसवेक विजयी होतील. या शंका नाही. मात्र आम्ही कोणतीही निवडणूक सहज घेत नाही, त्यासाठी परिश्रम घेतो. काही लोक आमच्यात आले आहे, काहींचे येणे निश्चित झाले आहे, तर काहींशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आमची ताकद वाढतच राहणार आहे, तसेच महापालिकेसाठी सुसज्ज अशी इमारत बांधण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत.
या इमारतीसाठी निधीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जयश्रीताई पाटील यांनी केली आहे. फडणवीस यांनी इमारतीच्या निधीचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत. निधी लवकर मिळेल, अशी अपेक्षा आहे. महापालिका निवडणूकीपूर्वी महापालिका इमारतीचे भूमिपूजन करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
प्रत्येक सोमवारी नागरिकांना भेटणारमी स्वत: आता माजी नगरसवेक, प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या घरी भेटी देऊन त्यांची विचारपूस करणार आहे. प्रशासकीय इमारतीत पालकमंत्र्यांच्या कार्यालयात मी प्रत्येक सोमवारी ११ नागरिकांना भेटणार आहे. त्यांचे प्रश्न, अडचणी जागेवर सोडविणार आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
जयंतरावांच्या डोक्यात काय, चेहऱ्यावरून कळत नाहीराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षात नाराज आहेत. या प्रश्नाबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जयंतरावांच्या डोक्यात काय आहे, ते त्यांच्या चेहऱ्यावर कळत नाही. त्यामुळे त्यांचा जवळचा कोणी असेल, तर त्याला माझ्या कानात सांगायला सांगा. जयंतरावांचे नेमके काय चालू आहे, सहजासहजी कळत नाही. ते नाही म्हणतात, त्यावेळी नक्कीच काही तर वेगळे करत असतात.