Sangli: पूरपट्ट्यातील नागरिकांच्या पुनवर्सनाचे ढोल वाजताहेत कागदावरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 19:25 IST2025-08-25T19:24:28+5:302025-08-25T19:25:35+5:30
पालकमंत्र्यांकडून घरे उंचावर बांधण्याचा पर्याय : बफर झोनमधील घर हलविणार कशी?

Sangli: पूरपट्ट्यातील नागरिकांच्या पुनवर्सनाचे ढोल वाजताहेत कागदावरच
शीतल पाटील
सांगली : पुराचे पाणी ओसरलंय..घरं पाण्याखाली गेली, संसार उद्ध्वस्त झाले, आता पूरपट्ट्यातील घरांच्या पुनवर्सनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला तोही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी. पुराचे पाणी घरात शिरत असल्याने नवीन बांधकामे करताना पहिला मजला रिकामा ठेवण्याचा पर्याय त्यांनी सुचविला. हा नियम महापालिकेच्या नगररचना विभागाकडे पूर्वीपासूनच आहे. पण त्याची अंमलबजावणी केली नाही. हा पर्याय ब्लू झोन (निळी रेषा) बाहेरील घरांसाठी लागू होतो. मग बफर झोनमधील घरांचे काय? पूरपट्यातील नागरिकांच्या पुनवर्सनाचे ढोल पुन्हा वाजू लागले आहेत. पण प्रत्यक्षात आराखडा, अंमलबाजवणी पूर्वीप्रमाणे कागदावर राहणार, असे मत जाणकार व्यक्त करतात.
सांगलीकरांनी आतापर्यंत तीन मोठ्या महापुराचा सामना केला आहे. यंदाही कृष्णा नदीने ४३ फुटांवर पातळी गाठली होती. पावसाचा जोर ओसरल्याने पुराची गंभीरता वाढली नाही तरीही १२५ कुटुंबातील ८०० लोकांना स्थलांतर करावे लागले. सूर्यवंशी प्लाॅट, आरवाडे पार्क, दत्तनगर, कर्नाळ रोड, जुना बुधगाव रस्ता, मगरमच्छ काॅलनी परिसराला पुराचा फटका बसलाच. पालकमंत्री पाटील यांनी पूरबाधित भागाचा दौरा केला. त्यानंतर पूरग्रस्तांच्या पुनवर्सनाबाबत भूमिकाही मांडली. पूरपट्ट्यातील नागरिकांचे अन्य जागेत पुनवर्सन करणे, पूरपट्टयातील नवीन बांधकाम करताना खालचा मजला रिकामा ठेवणे, नाल्यांची रुंदी वाढवणे, नाले खुले करणे असे अनेक पर्याय सुचविले. पण त्यात अनेक अडचणी आहेत.
जलसंपदा विभागाने ४३.५ फुटापर्यंत बफर झोन जाहीर केला आहे. त्याच्या आतील बांधकामांना परवानेच दिले जात नाहीत. घराचा पहिला मजला रिकामा ठेवण्याचा पर्याय बफरझोन बाहेरील बांधकामांसाठी उपयुक्त ठरेल. पण आतापर्यंत महापालिकेने बफरझोन बाहेर अनेक बांधकामांना परवाने दिले. अनेकांनी नियमांची तोडमोड करून बांधकामे केली. पहिला मजला रिकामा ठेवला नाही. परिणामी या मजल्यावर घरांत पाणी शिरण्याचा धोका अधिक आहे पण बफरझोनमधील नागरिकांचे काय? त्यांचे पुनवर्सन कसे करणार? नागरिक बाहेर जाणार का? असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे पुनवर्सनाचे ढोल वाजले तरी प्रत्यक्षात कार्यवाही कागदावर राहणार, हे स्पष्ट आहे.
अडीच हजार कोटींचा आराखडा
२००५ साली सांगली शहरासह जिल्ह्याला महापुराचा फटका बसला. यावेळी सांगलीत पुराची पातळी ५३.९ फुटांपर्यंत गेली होती. निम्म्याहून अधिक सांगलीत पुराचे पाणी शिरले होते. त्यानंतर तत्कालीन मदत व पुनवर्सन मंत्री डाॅ. पतंगराव कदम यांनी पूरपट्ट्यातील घरांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शहराच्या पूरपट्ट्यातील ७५० घरांचे पुनर्वसन केले जाणार होते. त्यासाठी २४०० कोटींचा खर्च अपेक्षित होता पण नंतर हा प्रस्ताव बारगळला.
काय आहे निळी रेषा
धरणातून ६० हजार क्युसेक्स पाणी सोडल्यानंतर नदीपात्रात पाणी जिथे पोहोचले, ती रेषा ब्लू लाईन अथवा निळी रेषा म्हणून ओळखली जाते. २००५च्या पुरानंतर सांगलीत ४३.५ फूटला निळी रेषा आखली आहे. त्यानंतर २०१९ व २०२१ साली पुन्हा महापुराचा दणका बसला पण निळी रेषा मात्र कोणताही बदल झाला नाही.
निळ्या पट्ट्यातील घरे
- जुना बुधगाव रस्ता : २५०
- मगरमच्छ काॅलनी : २५०
- सूर्यवंशी प्लाॅट : १२०
- बायपास ते कर्नाळ रोड : २२०
- कर्नाळ चौकी ते शेरीनाल्यापर्यंत : १५०
बफरझोनमध्ये नव्याने बांधकामे झाली आहेत. शेरीनाल्याच्या दोन्ही बाजूला बांधकामे झाली. नगररचना विभागाकडून नियमांचे पालन होत नाही. पहिला मजला रिकामा ठेवण्याचा नियम पूर्वीचाच आहे. त्याचीही अंमलबजावणी केलेली नाही. त्यात पूरपट्ट्यातील नागरिकही सध्याचे घर सोडून अन्यत्र जाण्यास तयार नाही. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. - हणमंत पवार, माजी नगरसेवक