किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीचा निर्णय म्हणजे सर्वनाशाकडे टाकलेले पाऊल : संभाजी भिडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 20:10 IST2022-01-28T20:09:54+5:302022-01-28T20:10:27+5:30
राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार असल्याचं भिडे यांचं वक्तव्य.

किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीचा निर्णय म्हणजे सर्वनाशाकडे टाकलेले पाऊल : संभाजी भिडे
सांगली : राज्य सरकारने किराणा दुकाने, सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे सर्वनाशाकडे टाकलेले पाऊल आहे. हा निर्णय घेऊन मंत्रिमंडळाने मोठे पाप केले आहे. वाईनला परवानगी देण्याचा निर्णय संतापजनक असून, हे सरकार बरखास्त करण्याची मागणी राज्यपालांकडे करणार आहे, अशी माहिती शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
"लोकशाहीसारख्या पवित्र मंदिरात राज्यमंत्रिमंडळाने घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे. राज्याला महसूल मिळावा यासाठी समाजाला विघातक निर्णय घेणे चुकीचे आहे. किराणा दुकानात वाईन उपलब्ध करून राज्य शासनाला नेमके काय साधायचे आहे हा प्रश्नच आहे," असंही भिडे म्हणाले. महाराष्ट्राने संपूर्ण देशाला देशपण आणि भवितव्य दिले आहे. त्यामुळे असा निर्णय घेणाऱ्या सरकारविरोधात सर्व संघटनांनी आता लढा उभारला पाहिजे. यासाठी मंत्रिमंडळाशी बोलून हा निर्णय मागे घेण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. अन्यथा राज्यपालांची भेट घेऊन राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले.
लिव्ह इन रिलेशनबाबत न्यायालयाने दिलेला निर्णयही चुकीचा आहे. कदाचित या वक्तव्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल होईल. मात्र, गुन्हा दाखल करूदेत त्यांनाही रामशास्त्री प्रभुणे यांच्याप्रमाणे ठणकावून सांगण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
आर. आर. पाटील यांची आठवण
"राज्य शासनाने वाईनबाबत निर्णय घेतल्यानंतर आर. आर. आबांची आठवण येत आहे. अनेकांचा विरोध झुगारून त्यांनी डान्सबार बंदी केली होती. आताही ते असते तर असला विघातक निर्णय त्यांनी घेऊच दिला नसता," असंही ते म्हणाले.