घरटे कमकुवत झाल्याने पिल्लू जमिनीवर पडले, सांगलीतील पक्षी मित्रांमुळे घारीची पिल्लांसोबत झाली पुनर्भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 15:57 IST2025-04-19T15:57:35+5:302025-04-19T15:57:57+5:30

तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर भेट यशस्वी

The chick fell to the ground due to the weak of the nest, thanks to bird friends from Sangli the gharial was reunited with its chicks | घरटे कमकुवत झाल्याने पिल्लू जमिनीवर पडले, सांगलीतील पक्षी मित्रांमुळे घारीची पिल्लांसोबत झाली पुनर्भेट

घरटे कमकुवत झाल्याने पिल्लू जमिनीवर पडले, सांगलीतील पक्षी मित्रांमुळे घारीची पिल्लांसोबत झाली पुनर्भेट

सांगली : येथील एसटी कॉलनीतील पतंगे यांच्या घराच्या अंगणात मंगळवारी पक्ष्याचे पिल्लू आढळून आले. जमिनीवरच्या पिल्लाची आणि मादी घारीची पुनर्भेट घडवून आणण्याची कामगिरी सांगलीतील पक्षी मित्रांनी तीन तासांच्या प्रयत्नाने यशस्वी पार पाडली.

पिल्लू नेमके कोणत्या पक्षाचे आहे, हेच कळत नव्हते. पतंगे यांनी पक्षी मित्र मेहत्रस व मानद वन्य जीव संरक्षक अजित पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पाहणी करून हे पिल्लू घारीचेच असल्याचा निष्कर्ष काढला. यादरम्यान, उंच वाढलेल्या नारळाच्या झाडाभोवती घारीच्या घिरट्या सुरू होत्या. नारळाच्या झाडावर असलेल्या घरट्यात मादी इतर पिल्लांसोबत असल्याचे आढळले. एक पिल्लू तिच्यासोबत, तर दुसरे माणसाच्या गराड्यात अडकलेले. मादी घार उंच आकाशी झेप घ्यायची आणि काही क्षणात परत घरट्याकडे परत यायची, असे बराच काळ सुरू होते, तरीही पक्षीप्रेमींनी धाडस करून उंच झाडावर चढून पाहिले असता, घरटे नाजूक झाल्याने पिल्लू जमिनीवर पडल्याचे दिसून आले. 

पक्षी मित्रांनी जमिनीवर पडलेले पिल्लू परत घरट्यात ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोन्ही पिले व्यवस्थित राहू शकतील एवढे घरटे मजबूत नव्हते. यावर पर्याय म्हणून बांबूच्या टोपलीत पिल्ले ठेवण्याचा आणि आहे त्याच जागी टोपली ठेवण्याचा निर्णय झाला. मारुती बंडगर यांनी पिलू घरट्यात सुखरूप ठेवल्यामुळे अथक प्रयत्नानंतर मादी घारीची आपल्या दोन पिल्लांशी पुनर्भेट झाली. यावेळी खोपा बर्डचे सचिन शिनगारे, ॲनिमल राहतचे कौस्तुभ पोळ, बर्ड साँग संस्थेचे सदस्य पाटील व मेहत्रस आदींनी आई व पिल्लाची पुनर्भेट घडवून आणण्यात मोलाची कामगिरी केली.

तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर भेट यशस्वी

बांबूच्या टोपलीत पिल्ले ठेवण्याचा आणि आहे त्याच जागी टोपली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, उंच नारळाच्या झाडावर चढून पिले सुरक्षित पोहच करणे आणि हे करत असताना घारीकडून हल्ल्याची भीती होतीच. शहरातील उंच झाडावर चढण्याची सवय असलेल्या मारुती बंडगर यांना पक्षी मित्रांनी बोलवले. त्यांनी हेल्मेट घालून ही किमया साधली आणि तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मादी घारीची आपल्या दोन पिल्लांशी पुनर्भेट झाली.

Web Title: The chick fell to the ground due to the weak of the nest, thanks to bird friends from Sangli the gharial was reunited with its chicks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली