Sangli: परीक्षा शुल्कासाठी बोर्डाने अडविला निकाल, मिरजेतील ३५८ विद्यार्थ्यांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 11:51 AM2024-02-29T11:51:11+5:302024-02-29T11:51:46+5:30

चूक लिपिकाची शिक्षा विद्यार्थ्यांना : आयुक्तांच्या आदेशानंतर लिपिक निलंबित

The board withheld the results of 358 students as the examination fee was not received in miraj sangli | Sangli: परीक्षा शुल्कासाठी बोर्डाने अडविला निकाल, मिरजेतील ३५८ विद्यार्थ्यांना फटका

Sangli: परीक्षा शुल्कासाठी बोर्डाने अडविला निकाल, मिरजेतील ३५८ विद्यार्थ्यांना फटका

मिरज : महापालिकेच्या मिरज हायस्कूलमधील कनिष्ठ लिपिक देवेश लक्ष्मण नलवडे याने २५ हजार रुपये परीक्षा शुल्काचा अपहार केल्याप्रकरणी उपायुक्त स्मृती पाटील यांनी त्यास बुधवारी निलंबित केले. देवेश नलवडे यांच्या विरुद्ध शहर पोलिसांतही तक्रार देण्यात आली आहे. मात्र, परीक्षा शुल्क मिळाले नसल्याने बोर्डाने ३५८ विद्यार्थ्यांचा निकाल अडविला आहे.

मिरज हायस्कूलमध्ये राज्य कला संचालनालयातर्फे ४ ते ६ ऑक्टोबर २०२३ रोजी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. मिरज शहर व तालुक्यातील २६ शाळेतील ६९५ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. नववी व दहावीचे विद्यार्थी या परीक्षेला बसतात. दहावीच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेचे ७ गुण दहावी बोर्ड परीक्षेत दिले जातात. या सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येकी १०० रुपयांप्रमाणे शुल्क आपापल्या शाळेत जमा केले होते. मिरज हायस्कूलमध्ये परीक्षा केंद्र असल्याने सर्व शाळांनी हे परीक्षा शुल्क मिरज हायस्कूलमध्ये जमा केले होते.

दरम्यान, ६९५ विद्यार्थ्यांपैकी ११ शाळेतील ३५८ विद्यार्थ्यांचे प्रत्येकी ७० रुपयांप्रमाणे एकूण २५ हजार ६० रुपये ही रक्कम जमा झाली; पण लिपिक देवेश नलवडे याने ती बोर्डाकडेही जमा केली नाही. यामुळे दहावी बोर्डाने या ३५८ विद्यार्थ्यांचे परीक्षेचे रिसीट पाठविले नाही. त्यानंतर नलवडे याने मुख्याध्यापक यांचे लेटरहेड व शिक्का वापरून त्यावर मुख्याध्यापक यांची खोटी सही केली.

परीक्षा बोर्डाशी बोगस पत्रव्यवहार केला. यामुळे या विद्यार्थ्यांना विनारिसीट परीक्षेस बसविण्यात आले. परीक्षेचा १ फेब्रुवारी रोजी निकाल लागल्यानंतर परीक्षा शुल्क जमा नसल्याने ३५८ विद्यार्थ्यांचा निकाल मिळाला नाही. त्यामुळे शाळेने याबाबत परीक्षा बोर्डाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर हा प्रकार समोर आला.

चौकशी करून फौजदारी कारवाई : स्मृती पाटील

बोर्डाने परीक्षा फीसाठी सर्व ३५८ विद्यार्थ्यांचा निकाल अडविल्याने या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. या प्रकरणाची चौकशी करून महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या आदेशाने उपायुक्त स्मृती पाटील यांनी लिपिक देवेश नलवडे यास निलंबित केले. नलवडे याच्यावर फौजदारी कारवाईसाठी मिरज पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी आणखी काही जणांची चौकशी होणार असून, यातील दोषींवर फौजदारी कारवाई होणार असल्याचे उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले.

Web Title: The board withheld the results of 358 students as the examination fee was not received in miraj sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.