सांगलीच्या बांधकाम क्षेत्रात तांत्रिक साक्षरतेचा प्रभाव

By Admin | Updated: September 15, 2014 00:02 IST2014-09-14T23:40:43+5:302014-09-15T00:02:26+5:30

नव्या संकल्पना : इको-फ्रेंडली बांधकामाकडे वाढता कल

Technical literacy in Sangli's construction area | सांगलीच्या बांधकाम क्षेत्रात तांत्रिक साक्षरतेचा प्रभाव

सांगलीच्या बांधकाम क्षेत्रात तांत्रिक साक्षरतेचा प्रभाव

नरेंद्र रानडे-सांगली -सध्याच्या धावपळीच्या काळात घर बांधकामाची प्रक्रिया पूर्वीपेक्षा गतीने होत असली, तरीही पारंपरिक वास्तुशास्त्राला महत्त्व न देता तांत्रिक साक्षरतेला प्राधान्य देण्याकडे अनेकांचा ओढा वाढला आहे. त्याचप्रमाणे आपण निसर्गाचे देणे लागतो, या भावनेने ‘इको फ्रेंडली’ पध्दतीने घराची संरचना करावी, अशीही काहींची मन:स्थिती बनत चालल्याचे आशादायी चित्र आहे.
आजच्या काळात जागांचे आणि बांधकाम साहित्याचे दर वाढलेले असले, तरीही इतरांपेक्षा आपले घर नावीन्यपूर्ण असावे, असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. पूर्वीच्या काळी जनसामान्यांवर वास्तुशास्त्राचा प्रचंड पगडा होता. कित्येकांनी तर बांधलेल्या घरांमध्ये फेरफार करून पुन्हा वास्तुशास्त्रानुसार बदल केल्याची उदाहरणेही आहेत. या पार्श्वभूमीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात घर बांधताना त्याकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून बघण्याची दृष्टी अनेकांना आली आहे. सूर्यप्रकाश, वारा घरात कोठून अधिक प्रमाणात येईल त्याठिकाणी मोठ्या खिडक्या करणे, पावसाळ्यात पावसाचे पाणी कोठून घरात येण्याचा संभव आहे तेथे भिंती उभारणे अशा महत्त्वाच्या गोष्टी ‘तांत्रिक साक्षरते’च्या चष्म्यातून पाहिल्या जात आहेत. साहजीकच यामुळे घराची रचनासुध्दा आकर्षक होत आहे. इतरांनी ज्या पध्दतीने घर बांधले, त्याच पायवाटेवरून न जाता आपल्या घराचा आदर्श इतरांनी घ्यावा या हेतूने बांधकाम करण्यात येत आहे.
वाढत्या महागाईच्या काळातदेखील शहरातील सुमारे १५ टक्के नागरिक मात्र आपले घर बांधताना ते इतरांपेक्षा महाग आणि सर्व सुखसोयींनीयुक्त असावे, यादृष्टीने प्रयत्नशील आहेत. त्यामध्ये मुख्य अडचण म्हणजे भविष्यात घर दुरुस्तीचा प्रसंग आला, तर त्याकरिता लागणारे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ स्थानिक पातळीवर उपलब्ध होत नसल्याने त्यांना मेट्रो सिटीत असणाऱ्या कारागीरांवर अवलंबून रहावे लागत आहे. तसेच दुसरीकडे ‘इको फ्रेंडली’ घरे बांधण्याचा कल वाढतो आहे. त्यामुळेच नवीन इमारती आणि घर बांधताना जाणीवपूर्वक त्यावर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची सुविधा करून घेण्यात येत आहे.
सूर्यप्रकाशाचा वापर अंघोळीच्या गरम पाण्यासाठी व्हावा आणि खर्चात बचत व्हावी, यासाठी ‘सोलर सिस्टिम’ बसविण्याचे वाढलेले प्रमाण हे पर्यावरण संवर्धनाच्यादृष्टीने महत्त्वाची बाब आहे.

Web Title: Technical literacy in Sangli's construction area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.