वर्गातील मुलांना शिकवायचे की आवरायचे? मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळताना शिक्षकांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:32 IST2021-02-05T07:32:05+5:302021-02-05T07:32:05+5:30
पुरोहित कन्या प्रशालेतील प्रत्येक वर्गात विद्यार्थिनींना मास्क सक्तीचा केला आहे. छाया : सुरेंद्र दुपटे लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ...

वर्गातील मुलांना शिकवायचे की आवरायचे? मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळताना शिक्षकांची तारांबळ
पुरोहित कन्या प्रशालेतील प्रत्येक वर्गात विद्यार्थिनींना मास्क सक्तीचा केला आहे.
छाया : सुरेंद्र दुपटे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : तब्बल दहा महिन्यांनी शाळा सुरु झाल्या. प्रदीर्घ सुट्टीनंतर सवंगडी एकत्र आले. अशावेळी त्यांच्या उत्साहाला आवर घालणार तरी कोण? पण ही मोठी जबाबदारी पार पाडण्याचे खूपच मोठे आव्हान शिक्षकांपुढे आहे.
शासनाने नववी ते बारावी आणि नंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यास परवानगी दिली खरी, पण सोबतच अटी आणि शर्तींची लांबलचक पत्रेही पाठवली. त्यांचे तंतोतंत पालन करेपर्यंत शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांची तारांबळ उडत आहे. अवखळ मुले सरांची पाठ फिरताच वर्गात धिंगाणा सुरु करतात. शासनाने मैदानावरील खेळांवर निर्बंध घातले आहेत, त्याची कसर मुले वर्गात भरून काढताना दिसत आहेत. शाळेच्या वेळेपूर्वीच येऊन वर्गात आणि मैदानावर मुलांचे खेळ रंगू लागले आहेत. त्यांना आवर घालण्यासाठी शिक्षकांना नाना क्लुप्त्या लढवाव्या लागत आहेत.
शाळेच्या मैदानावर मुले एकत्र येऊ नयेत, यासाठी काही शाळांनी प्रत्येक वर्ग सुटण्याच्या वेळेत काही अंतर ठेवले आहे. तास नसणारे शिक्षक मुलांवर लक्ष ठेवण्याचे काम करत आहेत. वर्ग सुरु होण्याअगोदरच मुले वर्गात येऊन खेळत बसू नयेत, याचीही खबरदारी घेतली जात आहे. हे सारे करताना शाळा व्यवस्थापन व शिक्षकांना चांगलीच सर्कस करावी लागत आहे.
पॉईंटर्स
पाचवी ते आठवी
- एकूण शाळा १,५८०
- विद्यार्थी उपस्थिती १,७५,४९९
- शिक्षक उपस्थिती ९,६००
कोट
वर्गात मास्कचा वापर सक्तीचा केला आहे. पन्नास टक्केच उपस्थिती असल्याने प्रत्येक बेंचवर एकाच विद्यार्थिनीला बसवतो. सोशल डिस्टन्सिंगची पुरेपूर काळजी घेतली जात आहे.
- रघुवीर रामदासी, शिक्षक
कोट
विद्यार्थ्यांचा परस्परांशी संपर्क येऊ नये, याची शंभर टक्के काळजी घेतो. मैदानावर रेंगाळणाऱ्या मुलांवर शिक्षक लक्ष ठेवतात. त्यासाठी तास नसणारे दोन शिक्षक जबाबदारी सांभाळतात. शाळेपर्यंत पालकच सोबत येत असल्यानेही मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन होते.
- परेश पाटील, शिक्षक
कोट
विद्यार्थ्यांना आवरणे ही मोठी जबाबदारी असली तरी काळजी घ्यावीच लागते. संसर्गाच्यादृष्टीने लहान मुले संवेदनशील असल्याने अधिक काळजी घ्यावी लागते. एकमेकांच्या वस्तू घेण्यावरही निर्बंध आणले आहेत.
- शिवलिंग मगदूम, शिक्षक
------------