टॅरिफचे ढग सांगलीच्या वेशीवर, १५०० कोटींची निर्यात प्रभावित होणार

By संतोष भिसे | Updated: April 21, 2025 15:36 IST2025-04-21T15:34:54+5:302025-04-21T15:36:57+5:30

२६ टक्के दर कमी करण्याचे अमेरिकन उद्योजकांचे आवाहन

Tariff clouds loom over Sangli exports worth 1500 crores will be affected | टॅरिफचे ढग सांगलीच्या वेशीवर, १५०० कोटींची निर्यात प्रभावित होणार

टॅरिफचे ढग सांगलीच्या वेशीवर, १५०० कोटींची निर्यात प्रभावित होणार

संतोष भिसे

सांगली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफ टॅक्सचे काळे ढग सांगली, मिरजेच्या वेशीवरही येऊन धडकले आहेत. त्याची अंमलबजावणी झाल्यास जिल्ह्यातून होणारी सुमारे १५०० कोटी रुपयांची औद्योगिक निर्यात मंदावण्याची भीती आहे.

ट्रम्प यांनी भारतावर २६ टक्के टॅरिफ जाहीर केले आहे. याचा फटका प्रामुख्याने औद्योगिक उत्पादनांना बसणार आहे. जिल्ह्यातील उद्योगांकडून अमेरिकेला वर्षाकाठी सुमारे १२०० ते १५०० कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्यात केली जाते. ट्रम्प यांच्या निर्णयानुसार त्यांना २६ टक्के अतिरिक्त कर लागणार आहे. साहजिकच अमेरिकेत त्यांच्या किमती २६ टक्क्यांनी वाढणार आहेत. या वाढीव किमतीला उत्पादने स्वीकारण्यास अमेरिकन आयातदार तयार नाहीत.

भारतातील उद्योजकांनी आपल्या उत्पादनांच्या किमती २६ टक्क्यांनी कमी कराव्यात, जेणेकरून अमेरिकेतील उत्पादने आहे त्याच किमतीला विकता येतील’, असाही प्रस्ताव अमेरिकेतील उद्योजकांनी दिला आहे. उत्पादनामध्ये नफ्याचे मार्जिन इतके मोठे नसल्याने येथील उद्योजकांमध्ये अस्वस्थता आहे.

संकट तूर्त टळले

हे व्यापारयुद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांनी टॅरिफच्या अंमलबजावणीला ९० दिवसांची स्थगिती दिली आहे. त्यामुळे हे संकट तूर्त टळले आहे.

सांगलीतून अमेरिकेला..

सांगली जिल्ह्यातून अमेरिकेला औद्योगिक आणि कृषी उत्पादने निर्यात होतात. औद्योगिक उत्पादनांमध्ये वाहनांचे सुटे भाग, रसायने, टेक्सटाइल्स्, विद्युत पंप व व्हॉल्व्ह, तेल आणि गॅस उत्पादनांशी संबंधित उपकरणांचा समावेश आहे.

ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरिफ टॅक्समधून भारताला सवलत मिळेल, अशी अपेक्षा आहे. यासाठी केंद्र सरकारच्या स्तरावर वाटाघाटी सुरू असून, आम्हा उद्योजकांचे लक्ष त्याकडे लागले आहे. निर्यात तूर्त थांबलेली नाही, पण या व्यापारयुद्धातून सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. - संजय अराणके, संचालक, सांगली-मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन

Web Title: Tariff clouds loom over Sangli exports worth 1500 crores will be affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.