Sangli: हेच माझे रक्षाबंधन; कारगिल युद्धभूमीवरील स्मारकाच्या ठिकाणी जाऊन बहिणीने वाहिली भावाला आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 17:56 IST2025-07-29T17:51:11+5:302025-07-29T17:56:58+5:30

सैन्यात भरती झाल्यावर पाचव्या वर्षीच देशासाठी बलिदान दिले

Surekha Shinde, sister of martyred soldier Mahadev Patil from Sangli, went with her husband to the memorial on the Kargil battlefield and paid tribute to her brother by tying a rakhi | Sangli: हेच माझे रक्षाबंधन; कारगिल युद्धभूमीवरील स्मारकाच्या ठिकाणी जाऊन बहिणीने वाहिली भावाला आदरांजली

Sangli: हेच माझे रक्षाबंधन; कारगिल युद्धभूमीवरील स्मारकाच्या ठिकाणी जाऊन बहिणीने वाहिली भावाला आदरांजली

घाटनांद्रे (जि. सांगली) : देशाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या आपल्या भावाला २६ वर्षांनंतर त्याच्या कारगिलच्या रणभूमीवर जाऊन बहिणीने अभिमान व भावनांनी ओथंबलेल्या शब्दांत आदरांजली वाहिली. तिच्या डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंतून अनोख्या रक्षाबंधनाचे नाते पाहून अनेकांचे डोळे पाणावले.

कारगिल युद्धात ५०० हून अधिक जवान शहीद झाले होते. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील महादेव नामदेव पाटील (वडगाव, ता. तासगाव) व सुरेश गणपती चव्हाण (करोली-टी, ता. कवठेमहांकाळ) या दोन जवानांचा समावेश होता. २६ वर्षांनंतर कारगिल विजयदिनी भारतीय लष्कराने शहीद जवानांच्या वारसांना कारगिल येथील कार्यक्रमास हजर राहण्यासाठी निमंत्रित केले होते. हेच औचित्य साधून शहीद जवान महादेव पाटील यांची बहीण सुरेखा शिंदे यांनी पती मधुकर शिंदे यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष युद्धभूमीवरील स्मारकावर जाऊन आदरांजली वाहिली.

कारगिलच्या डोंगररांगांमध्ये ताठ मानेने उभ्या असलेल्या स्मारकासमोर आल्यानंतर सुरेखा शिंदे यांचे डोळे पाणावले. ‘माझा भाऊ अविवाहित होता, पण त्याने सैन्यात भरती झाल्यावर पाचव्या वर्षीच देशासाठी बलिदान दिले. त्याने देशासाठी शौर्यगाथा नोंदविली. त्याचा मला अभिमान आहे’, असे सांगताना त्यांच्या भावना, प्रेम अनावर झाल्या.

रक्षाबंधनाच्या सणाची आठवण काढताना त्या म्हणाल्या, ‘जाताना न चुकता राखीही घेऊन गेले. हेच माझे खरे रक्षाबंधन आहे, अशा शब्दात त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. भावाच्या स्मृती जागवणारी राखी स्मारकावर बांधताना तिच्या प्रेमळ भावनांनी उपस्थितांच्या डोळ्यातही पाणी आणले.

कारगिल विजय दिवसाचा उत्सव हा केवळ विजयाचा नव्हे, तर आपल्या शूर सैनिकांच्या बलिदानाचा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यागाचा साक्षीदार मानला जातो. सुरेखा शिंदे यांच्या मनात एका बाजूला अभिमान अन् भावाच्या नसण्याच्या वेदना असे द्वंद्व सुरू होते.

हेच माझे रक्षाबंधन

आदरांजलीच्या कार्यक्रमानंतर बोलताना सुरेखा शिंदे म्हणाल्या, माझा भाऊ देशासाठी शहीद झाला. या स्मारकावर राखी बांधताना त्याच्या आठवणींनी मन भरून आलं. माझ्या भावासाठीचे हेच खरे रक्षाबंधन. आज त्याचा अभिमान असूनही डोळ्यांत पाणी आलं.

Web Title: Surekha Shinde, sister of martyred soldier Mahadev Patil from Sangli, went with her husband to the memorial on the Kargil battlefield and paid tribute to her brother by tying a rakhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.