सांगली : नदीकाठच्या गावांत पूरपरिस्थितीमुळे टॅंकरने शुद्ध पाण्याचा पुरवठा त्वरित सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले. पूरस्थिती कमी होईल तशी स्वच्छता मोहीम राबविण्यासही सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांची मंगळवारी वारणाकाठच्या कणेगाव, बोरगाव, जुने खेड, वाळवा व आष्टा येथे पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी तहसीलदार राजेंद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, पुरानंतर अन्य आजारांची शक्यता आहे. त्यासाठी काळजी घ्यावी. रोगराई पसरू नये यासाठी आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत. प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप सुरू करावे. पिण्याचे पाणी मेडिक्लोर टाकून शुद्ध करावे. शेतीचे नुकसान, घरांची पडझड, जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान यांचे पंचनामे शासनाच्या निकषानुसार करावेत व अहवाल तातडीने जिल्हा प्रशासनास सादर करावा.