ग्रामपंचायतमध्ये निवडून येण्यासाठी अंधश्रद्धेला खतपाणी; बाहुल्या, लिंबू, हळद-कुंकू ठेवले चौकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2022 16:21 IST2022-12-16T16:20:58+5:302022-12-16T16:21:15+5:30
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वारणाकाठी असलेल्या कनेगावात ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येण्यासाठी आता अंधश्रद्धेचा आधार घेतला जात आहे.

ग्रामपंचायतमध्ये निवडून येण्यासाठी अंधश्रद्धेला खतपाणी; बाहुल्या, लिंबू, हळद-कुंकू ठेवले चौकात
सांगली जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुका पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी कंबर कसली आहे. त्यातच विरोधकांच्या वर भानामती करण्याचा प्रकार ही घडत आहे. जिल्ह्यातील खानापूर आणि वाळवा तालुक्यात हे प्रकार आढळून आले आहेत. उमेदवार निवडून येण्यासाठी आता जादुटोणा-भानामतीचा आधार घेऊ लागले आहेत.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वारणाकाठी असलेल्या कनेगावात ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येण्यासाठी आता अंधश्रद्धेचा आधार घेतला जात आहे. कोणीतरी दुरडीत केळी, कापडपीस, बाहुल्या, लिंबू, हळदी-कुंकू टाकून हे साहित्य कणेगावच्या चौका-चौकात मंगळवारी, बुधवारी मध्यरात्री ठेवले होते.
वाळवा तालुक्यातील कनेगाव येथील मारूती चौक, हायस्कूल चौक, भरतवाडी रोड, नवीन गावठाण वसाहत अशा प्रत्येक ठिकाणी अशा भानमतीच्या दुरड्या लोकांचे लक्ष वेधत आहेत. तर खानापूर तालुक्यातील जाधवनगर येथे ही भानामतीचा प्रकार समोर आला आहे. प्रचाराच्या बॅनरसमोर नारळ, हळद-कुंकू, लिंबू आढळून आले आहे. या घटनेने परिसरात विविध चर्चा रंगू लागली आहे.