वाळवा तालुक्यात गटशेतीतून उन्हाळी साेयाबीन बीज उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:25 IST2021-03-24T04:25:11+5:302021-03-24T04:25:11+5:30
ओळ : शिगाव (ता. वाळवा) येथे उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन शेतीची पाहणी कृषी अधिकाऱ्यांनी केली. विनोद पाटील शिगाव : शिगाव ...

वाळवा तालुक्यात गटशेतीतून उन्हाळी साेयाबीन बीज उत्पादन
ओळ : शिगाव (ता. वाळवा) येथे उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन शेतीची पाहणी कृषी अधिकाऱ्यांनी केली.
विनोद पाटील
शिगाव : शिगाव (ता. वाळवा) येथील १७० शेतकऱ्यांनी एकत्र येत गटशेतीचा प्रयोग राबवला आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाण्यांची मोठी गरज भासणार आहे. हे लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या सहकार्याने गटशेतीच्या माध्यमातून बियाणे उत्पादनाचा यशस्वी प्रयोग सांगलीच्या वाळवा तालुक्यात यशस्वी केला आहे.
१७० शेतकऱ्यांनी एकत्रित येत १०० एकरावर सोयाबीन पेरणी केली आहे. यामधून त्यांना ८०० क्विंटल उच्च दर्जाच्या सोयाबीनचं उत्पादन होण्याची अपेक्षा असून, त्याचा वापर बियाणे म्हणून करण्यात येणार आहे.
शिगाव (ता. वाळवा) येथील युवा शेतकरी कौस्तुभ बारवडे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात यंदा बियाणांचा तुटवडा भासणार आहे. गेल्या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि बोगस बियाणे याचा पीक उत्पादनाला फटका बसला आहे. याचा परिणाम यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणी उपलब्ध होण्यात निर्माण होणार आहे. ही गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र शासन, कृषी विभाग आणि कृषी संशोधन विभाग झुकेनी फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून ग्राम बीजोत्पादन योजना राबविण्यात आली. वाळवा तालुक्यातील ४० गावांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. १०० एकर क्षेत्रावर गट शेतीच्या माध्यमातून ८०० क्विंटल सोयाबीन बियाणे निर्मितीचं उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. १७० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तालुक्यात कसबे डिग्रज कृषी संशोधन केंद्राकडून विकसित करण्यात आलेल्या सोयाबीनच्या फुले संगम या वाणाचे उन्हाळी हंगामात पीक घेतले आहे.
वाळवा तालुका कृषी अधिकारी भगवान माने म्हणाले, गटशेतीद्वारे सोयाबीनच्या लागवडीचा हा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे. तर उत्तम दर्जाचे बियाण्यांची निर्मिती होण्यासाठी या सोयाबीन पिकावर ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्यात आली. ज्यामुळे कमी वेळेत व कमी खर्चात शेतकऱ्यांना औषध फवारणी करणं शक्य झालं आहे, तसेच यामुळे उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादनाचा नवीन वाळवा पॅटर्न यामुळे उदयास येणार आहे.
यावेळी जिल्हा कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, कसबे डिग्रज कृषी संशोधन केंद्राचे संशोधक मिलिंद देशमुख, तालुका कृषी अधिकारी भगवानराव माने, आत्माचे नागेश जमदाडे, कृषी सहायक अधिकारी पवन जाधव, श्रीरंग फारणे, अरूण जाधव, राजारामबापू पाटील कारखान्याचे संचालक प्रदीपकुमार पाटील, सुभाष जमदाडे, गणेश यादव व शेतकरी बांधव उपस्थित होते.