मराठा आरक्षणाला पाठिंबा देत ऊस आंदोलनाची आक्रोश पदयात्रा स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 17:07 IST2023-10-30T17:06:43+5:302023-10-30T17:07:19+5:30
शिराळा तालुक्यातील करमाळा येथे त्यांनी आक्रोश पदयात्रा स्थगित केली.

मराठा आरक्षणाला पाठिंबा देत ऊस आंदोलनाची आक्रोश पदयात्रा स्थगित
इस्लामपूर : मराठा आरक्षणाबाबत दिरंगाई करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करत स्वाभिमानीचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी मराठा आरक्षणासाठी प्राण पणाला लावत उपाेषणास बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्यासह सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत आपली पदयात्रा स्थगित करत असल्याचे जाहीर केले. याचवेळी त्यांनी ४०० रुपयांचा दुसरा हप्ता घेतल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही असा इशाराही दिला.
शिराळा तालुक्यातील करमाळा येथे त्यांनी आक्रोश पदयात्रा स्थगित केली. त्यानंतर इस्लामपूर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर केली. यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह मराठा आंदोलनातील कार्यकर्ते उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, गेल्या वर्षीच्या उसाला प्रतिटन ४०० रुपयांचा दुसरा हप्ता आणि ऑनलाईन वजन काटे या मागण्या घेऊन १७ ऑक्टोबरपसून ही पदयात्रा शिरोळ येथून सुरू झाली. १४ दिवसात ३०० किलाेमीटर पायी प्रवास झाला. दरम्यान राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणावरून मोठी अस्वस्थता आहे. पहिल्या उपोषणानंतर जरांगे-पाटील यांनी सरकारला पुरेसा वेळ दिला होता. मात्र सरकरने पुन्हा त्यांच्यावर उपोषणाची वेळ आणली. मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे ही स्वाभिमानीची भूमिका पहिल्यापासून आहे. २०११ च्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत मी मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला होता. केंद्र सरकारने पुढाकार घेतल्याशिवाय कायमस्वरूपी तोडगा निघणार नाही. तसेच राज्य सरकारलाही आपली जबाबदारी झटकता येणार नाही.
शेट्टी म्हणाले, पदयात्रा स्थगित केली आहे. ती रद्द केलेली नाही आणि माघारही घेतलेली नाही. काही काळानंतर ती पुन्हा निघणार आहे. सांगली-कोल्हापुरातील कारखाने ४०० रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांचे १२०० कोटी देणे लागत आहेत. ते त्यांना गिळंकृत करू देणार नाही. १ नोव्हेंबरपसून हंगाम सुरू करण्याची तयारी चालली आहे. मात्र संघटनेचे कार्यकर्ते गनिमी काव्याने ऊस वाहतूक, साखर वाहतूक रोखून धरणार आहेत. हंगाम सुरू होऊ देणार नाही.
मराठा क्रांती मोर्चाच्या दिग्विजय पाटील यांनी मराठा समाजासाठी दोन पाऊले मागे घेत आंदोलन स्थगित केल्याबद्दल राजू शेट्टी यांचे स्वागत केले. तुमचे आंदोलन सुरू होईल त्यावेळी मराठा क्रांती मोर्चा तुमच्यासोबत असेल अशी ग्वाही दिली. यावेळी ऍड. एस. यु. संदे, महेश खराडे, भागवत जाधव, संदीप राजोबा, आप्पासाहेब पाटील, उमेश कुरळपकर, विजय महाडीक, प्रकाश देसाई, शिवाजी पाटील, रविकिरण माने उपस्थित होते.