शिष्यवृत्तीप्रकरणी फौजदारी दाखल करा
By Admin | Updated: July 5, 2014 23:56 IST2014-07-05T23:55:11+5:302014-07-05T23:56:36+5:30
सदस्यांची मागणी : मिरज पं. स. सभेत सदस्य आक्रमक

शिष्यवृत्तीप्रकरणी फौजदारी दाखल करा
मिरज : वड्डी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत अपहार करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मिरज पंचायत समितीच्या सभेत सदस्यांनी केली. रोजगार हमी योजनेच्या कामातील ग्रामसेवक दिरंगाई करीत असल्याचा आरोप करीत सभेत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
सभापती सुभाष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, उपसभापती माणिकताई चौधरी, गटविकास अधिकारी उत्तम वाघमोडे यांच्या उपस्थितीत पंचायत समितीची मासिक सभा पार पडली. वड्डी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या रकमेत अपहार करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांवर कोणती कारवाई केली, असा प्रश्न सदस्या राणी देवकारे यांनी विचारला. यावेळी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शिष्यवृत्तीच्या रकमेत अपहार झाला यासाठी पंचायत समितीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या गंभीर बाबीची दखल घेऊन शिक्षण विभागाने तातडीने कारवाई करण्याची गरज असताना कागदीघोडे नाचविण्यात येत आहेत. दोशी मुख्याध्यापक व शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सतीश निळकंठ, शंकर पाटील यांनी केली, तर त्या मुख्याध्यापक व शिक्षकाची तालुक्याबाहेर बदली करा, अशी मागणी आबासाहेब चव्हाण यांनी केली. शुभांगी पाटील व सारिका खताळ यांनी गुणवत्ता विकासासाठी शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येचे प्रश्न उपस्थित केले.
गेल्या तीन वर्षात १३ व्या वित्त आयोगाअंतर्गत के लेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामांची समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी दिलीप बुरसे यांनी केली. पंचवीस पंधरा योजनेच्या १ कोटीचा विशेष निधी आधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे परत गेल्याचा आरोप सतीश निळकंठ यांनी केला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एस. एस. सुतार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळाला नसल्याचे सांगत आरोप फेटाळून लावला. १ कोटीचा निधी पंचायत समितीच्या बांधकाम विभागास मिळाल्याचे अभियंता पी. के. प्रदीप यांनी सांगितले.
बुधगावातील अनिल दुधाप्पा होवाळे, सुदाम रघुनाथ बंडगर व मधुकर रामचंद्र पाटील या शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेतील विहिरी मंजूर आहेत. या शेतकऱ्यांना विहिरींचे निम्मे अधिक अनुदान मिळाले त्यानंतर तीन ग्रामसेवकांनी हजेरी पुस्तक न भरल्याने हे शेतकरी उर्वरीत अनुदानापासून वंचित असल्याची तक्रार सतीश निळकंठ यांनी केली.
शेतकऱ्यांनी डोक्यावर कर्जाचा बोजा करुन विहिरी पूर्ण केल्या आहेत. उर्वरीत अनुदान न मिळाल्यास त्यांचे संसार उद्ध्वस्त होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामसेवकांमुळेच रोजगार हमी योजनेची कामे रखडल्याचा आरोप बाबासाहेब कांबळे यांनी केला. बुधगावच्या शेतकऱ्यांच्या विहिरीच्या अनुदानाबाबत चौकशी करुन न्याय देण्याचे ओदश गटविकास अधिकारी उत्तम वाघमोडे यांनी दिले.
या बैठकीत कृषी, पशुसंवर्धन, पाणी पुरवठा, छोटे पाटबंधारे, आरोग्य व ग्रामपंचायत आदींसह सर्व विभागांचा आढावा घेण्यात आला. (वार्ताहर)