संतोष भिसे/लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र हा राजकारणाचा विषय नसून, विद्यार्थ्यांची शैक्षणिक जडणघडण करणारे केंद्र आहे, याचा विसर नेत्यांना पडला आहे. उपकेंद्र तासगावमध्ये की खानापूरमध्ये यावरून त्यांच्यात जुंपली आहे. पण ही दोन्ही ठिकाणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत गैरसोयीची असल्याकडे डोळेझाक केली जात आहे. सर्वांच्या सोयीसाठी उपकेंद्र सांगलीतच होणे आवश्यक आहे, याचा विसर पडला आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बस्तवडे (ता. तासगाव) येथे उपकेंद्राला प्राथमिक मंजुरी देताना विद्यार्थ्यांच्या सोयीचा विचार केलेला नाही. या मंजुरीमागे फक्त राजकीय हेतू दिसत आहे. कोणाला तरी खूश करणे किंवा कोणाच्या तरी उपकारातून उतराई होणे, या हेतूने झालेला उपकेंद्राचा निर्णय जिल्ह्याच्या वाटचालीवर दूरगामी परिणाम करणार आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठीचा संघर्ष सांगली शहरातूनच सुरु झाला होता. त्याचे फळ तासगाव किंवा खानापूर तालुक्यात नेऊन टाकल्याने विद्यार्थ्यांची कुतरओढ होणार आहे. विद्यापीठांचे विकेंद्रीकरण व्हावे, अशी शिफारस राष्ट्रीय ज्ञान आयोगाने केली, याचा सोयीस्कर अर्थ घेत उपकेंद्र जिल्ह्याच्या कुठल्या तरी कोपऱ्यात नेऊन टाकले जात आहे. याला सर्व स्तरातून तीव्र विरोध होत आहे. २०१३पासून विद्यापीठाच्या समितीने जिल्हाभरात ३२ गावांची पाहणी केली. रेणावी, बस्तवडे, खानापूर, तासगाव, सांगली, आदी गावे विचारात घेतली. यावर अंतिम निर्णय घेताना मात्र सारासार विचार केला नाही.
चौकट
शिक्षणात पुण्यानंतर सांगलीचा दबदबा
अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिक्षणासाठी पुण्यानंतर सांगलीकडे पाहिले जाते. विलिंग्डन, वालचंद, चिंतामणराव, कस्तुरबाई वालचंद, मथुबाई गरवारेसारख्या गुणवत्तापूर्ण महाविद्यालयांमधून हजारो नामवंत विद्यार्थी बाहेर पडले आहेत. अनेक दिग्गजांनी येथे विद्यार्थी घडवले आहेत. अजूनही शिक्षणक्षेत्रात या महाविद्यालयांचा दबदबा कायम आहे. अनेक नवनव्या शिक्षण शाखाही सांगलीतच सुरू होत आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणक्रमांच्या देशभरातील ॲकॅडमींनी सांगली शहराला पसंती दिली आहे. खुद्द खानापूर, तासगावचेही विद्यार्थी चांगल्या शिक्षणासाठी सांगलीतच येऊन राहतात. अशा स्थितीत विद्यापीठाच्या कामासाठी विद्यार्थ्यांनी तासगाव-खानापूरला जाणे म्हणजे द्राविडी प्राणायाम ठरेल.
चौकट
नियमांना बगल दिली
विद्यापीठाच्या नियमानुसार जिल्हा मुख्यालयापासून २५ किलोमीटरच्या परिघात उपकेंद्र असायला हवे. मंत्री सामंत यांनी याचा विचार न करताच उपकेंद्राची जागा जाहीर केली आहे. विद्यापीठ म्हणजे जिल्ह्याचे शैक्षणिक प्रवेशद्वार असते. आता सांगली, मिरजपासून ४५ किलोमीटरवरील बस्तवडेला जाणे म्हणजे यातायात ठरणार आहे.