कक्षसेवकास लाच घेताना अटक
By Admin | Updated: August 3, 2014 01:51 IST2014-08-03T01:21:34+5:302014-08-03T01:51:40+5:30
‘सिव्हिल’मध्ये पकडले : पोलिसाकडून घेतली लाच

कक्षसेवकास लाच घेताना अटक
सांगली : वैद्यकीय बिल मंजुरीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हिल सर्जन) यांचा अभिप्राय घेण्यासाठी पोलिसाकडून चार हजार दोनशे रुपयांची लाच घेणाऱ्या सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील (सिव्हिल) कक्षसेवक प्रसाद लक्ष्मण मोहिते (वय ३५, रा. विनायकनगर, शंभरफुटी रस्ता, सांगली) यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडून अटकेची कारवाई केली. आज, शनिवारी दुपारी दोन वाजता रुग्णालयात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
विश्रामबाग येथे नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी वैभव पाटील यांच्या मुलाच्या खांद्यावर काही दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली आहे. यासाठी झालेल्या औषधोपचाराच्या खर्चाचे बिल जिल्हा शल्य चिकित्सकांकडून मंजूर करून घेण्यासाठी पाटील यांनी प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव त्यांनी सादरही केला होता. यासाठी कक्षसेवक म्हणून नियुक्तीस असलेल्या प्रसाद मोहिते याने पाटील यांच्याकडे जिल्हा शल्य चिकित्सकांचा अभिप्राय घेण्यासाठी एकूण बिलाच्या १२ टक्के लाच देण्याची मागणी केली. टक्केवारीतील ही रक्कम सात हजार तीनशे रुपये होती. पाटील यांनी यामध्ये पैसे कमी करण्यासाठी मागणी केली. त्यावेळी मोहितेने सात टक्के तरी द्यावे लागतील, असे सांगून चार हजार दोनशे रुपयांची मागणी केली.
या घडामोडीनंतर पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. या विभागाने लावलेल्या सापळ्यानुसार पाटील यांनी आज दुपारी लाच देण्याची मागणी केली. तत्पूर्वी लाचलुचपतच्या पथकाने तिथे सापळा लावला. पाटील यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना मोहितेला रंगेहात पकडून अटकेची कारवाई केली. या कारवाईनंतर रुग्णालयात खळबळ माजली होती. त्याला उद्या, रविवारी दुपारी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)