Strictly check the treatment of corona patients: Jayant Patil | कोरोना रूग्णांवरील उपचाराची कडकपणे तपासणी करा : जयंत पाटील

कोरोना रूग्णांवरील उपचाराची कडकपणे तपासणी करा : जयंत पाटील

ठळक मुद्देकोरोना रूग्णांवरील उपचाराची कडकपणे तपासणी करापालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले निर्देश

सांगली : जिल्ह्यात विविध रूग्णालयांत उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांवर व्यवस्थितपणे उपचार होतात हे तपासण्यासाठी नेमण्यात आलेल्या ट्रिटमेंट ऑडिट पथकाने कडकपणे तपासणी करावी. तपासणीमध्ये काही त्रुटी आढळल्यास संबंधितांच्या निदर्शनास आणून त्या तात्काळ दुरूस्त कराव्यात, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अप्पर पोलिस अधीक्षक मनिषा डुबुले, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, उपजिल्हाधिकारी (महसूल) विजया यादव, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र गाडेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी आदि उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोना संसर्गाची जिल्ह्यातील सद्यस्थिती, उपलब्ध बेड्स, ऑक्सिजन पुरवठा, औषध पुरवठा, व्हेंटिलेटर, टेस्टिंग किट, बिलांचे व उपचाराचे ऑडिट या अनुषंगाने सविस्तर आढावा घेतला. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत वेळोवेळी चर्चा करून मार्गदर्शन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

जिल्ह्यात 3 ऑक्टोबर अखेर एकूण 38 हजार 518 कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांपैकी 30 हजार 506 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये 1 हजार 59, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 326, कोविड केअर सेंटरमध्ये 285 रूग्ण उपचार घेत असून होम आयसोलेशनमध्ये 4 हजार 866 रूग्ण असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

Web Title: Strictly check the treatment of corona patients: Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.