ई-पुस्तकातून ग्रंथालयाचे वाचनसंस्कृतीला बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:26 IST2021-05-23T04:26:16+5:302021-05-23T04:26:16+5:30
सांगली : पुस्तके माणसाला आनंद देतात, वाचनातून मानसिक बळ देताना जगण्याची कलाही शिकवितात. माणसाच्या आयुष्यातील या बहुगुणी पुस्तकांशी वाचकांचे ...

ई-पुस्तकातून ग्रंथालयाचे वाचनसंस्कृतीला बळ
सांगली : पुस्तके माणसाला आनंद देतात, वाचनातून मानसिक बळ देताना जगण्याची कलाही शिकवितात. माणसाच्या आयुष्यातील या बहुगुणी पुस्तकांशी वाचकांचे नाते कोरोनामुळे तुटले. गेले दोन वर्षांपासून सतत बंद असलेल्या ग्रंथालयांचे मोठे नुकसानही झाले. अशावेळी सांगलीच्या एका वाचनालयाने या गोष्टीची पर्वा न करता वाचनसंस्कृती टिकावी म्हणून वाचकांना पुस्तकांच्या पीडीएफ फायली पाठविण्याचा उपक्रम सुरू केला.
लाॅकडाऊनमुळे राज्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालये दिनांक १५ एप्रिलपासून कुलूपबंद झाली. वाचन कक्ष, ग्रंथ देवघेव, अभ्यासिका, सांस्कृतिक उपक्रम अशा सर्व ग्रंथालयीन सेवा स्थगित ठेवण्यात आल्या. परिणामी वाचकांपासून ग्रंथालय आणि ग्रंथालयापासून वाचक दुरावला. गेल्या वर्षीच्या कुलूपबंदीपासून आजअखेर लॉकडाऊनच्या सर्वाधिक झळा या सार्वजनिक ग्रंथालय विश्वालाच बसल्या आहेत.
परीक्षा रद्द झाल्यामुळे ऑनलाईन अभ्यासापासून बंधमुक्त झालेला बालकुमार वर्ग घरच्या घरी अस्वस्थ, तर पालक वर्ग कासावीस दिसत आहे. खेळ बंद, मैदाने ओस, घरी-दारी टेलिव्हिजन व मोबाईल वगळता कोणतेही मनोरंजनाचे साधन उपलब्ध नाही. अशा अस्थिरतेच्या वातावरणात सांगलीच्या वसंतनगर येथील कुस्तीसम्राट युवराज पाटील वाचनालयाने सभासदांचा ग्रंथालयाच्या नावाने व्हाॅट्सॲप ग्रुप तयार केला आणि या माध्यमातून आपल्या सभासदांना आठवड्यातून एकदा दोन पुस्तकांची पीडीएफ पाठविण्याचा उपक्रम सुरू केला. त्यामुळे ग्रंथालय आणि ग्रंथालयीन सेवा शासनाच्या आदेशानुसार बंद राहिली तरी, ग्रंथालयाचा सभासद वाचनापासून, त्याच्या पुस्तकमैत्रीपासून दुरावला नाही.
कोरोनासंसर्गाच्या कालखंडात सभासद घरी राहून पुस्तक वाचू शकत आहे. या उपक्रमाअंतर्गत ग्रंथालयाने कथा, कादंबरी, कविता, ललित, विनोदी, अनुवादित, धार्मिक, बालकुमार, पाकशास्त्र अशा साहित्य प्रकारांतील पुस्तकांच्या पीडीएफ निवडल्या. सभासदांच्या कुटुंबातील वयपरत्वे ज्येष्ठ नागरिक, प्रौढ, तरुण, तरुणी, बालकुमार, महिला अशा विविध वयोगटांतील प्रत्येकाला वाचनाचा आनंद मिळाला. त्यातून ग्रंथालयाला कुटुंब सभासद ही संकल्पना साकारता आली.
चौकट
वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या उपक्रमाला सभासदांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यानिमित्ताने ग्रंथालयाला वाचकांशी बांधीलकी जपता आली. सध्या कोणत्याही वर्गणीशिवाय ही सेवा सुरू केली आहे.
कोट -
ग्रंथालयांनी अशा प्रकारे सेवा दिली तर ग्रंथालये वार्षिक वर्गणीला मुकतील ही ग्रंथालय विश्वातील भीती निराधार असून, चांगल्या सेवा-सुविधा वाचकवर्गाला उपलब्ध करून दिल्या तर आवश्यक ती वर्गणी देण्यास वाचक वर्ग तयार असतो.
- सौ. लतिका पाटील, ग्रंथपाल, कुस्तीसम्राट युवराज पाटील वाचनालय, सांगली.