चिनी बेदाण्याची बेकायदा आयात थांबवा; विशाल पाटील यांनी संसदेत उपस्थित केला द्राक्ष उत्पादकांचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 17:31 IST2025-07-31T17:30:18+5:302025-07-31T17:31:00+5:30

बेदाणा उत्पादकांना संकटातून बाहेर काढा

Stop illegal import of Chinese raisins; MP Vishal Patil raises issue of grape growers in Parliament | चिनी बेदाण्याची बेकायदा आयात थांबवा; विशाल पाटील यांनी संसदेत उपस्थित केला द्राक्ष उत्पादकांचा प्रश्न

चिनी बेदाण्याची बेकायदा आयात थांबवा; विशाल पाटील यांनी संसदेत उपस्थित केला द्राक्ष उत्पादकांचा प्रश्न

सांगली : चीनमध्ये तयार केला जाणारा बेदाणा नेपाळमार्गे चोरट्या मार्गाने, बेकायदेशीपणे भारतात येतो आहे. त्याने भारतीय बेदाण्याचे दर पडले असून त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ही चोरटी आयात थांबवा, असे आवाहन खासदार विशाल पाटील यांनी बुधवार संसदेत केले.

विशाल पाटील संसदेत बोलताना म्हणाले, यावर्षी बेदाणा उत्पादक शेतकऱ्याला चांगल्या दराची अपेक्षा होती. उत्पादन कमी झाले होते, मात्र दर चांगले येणार होते. विशेषतः आता कृष्ण जन्माष्टमी आणि पुढे नवरात्र उत्सवानिमित्त उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात बेदाण्याची मागणी असते. त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. तोवर गेल्या काही दिवसांत चीनचा बेदाणा मोठ्या प्रमाणात बाजारात आला आणि एकच गोंधळ माजला. भारतीय बेदाण्याचा उठाव कमी झाला. दर पडले.

सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी द्राक्ष पीक घेतात. बेदाणा निर्मिती करतात. त्यातून त्यांना थोडे जास्त उत्पन्न मिळते. परंतु, गेल्या काही दिवसांत चीनमध्ये तयार होणारा बेदाणा नेपाळमार्गे भारतात येतो आहे. ही बेकायदेशीर आयात आहे. त्याचा परिणाम म्हणून भारतीय बेदाण्याचा दर पडतो आहे. शेतकरी अडचणीत येत आहेत. ते आत्महत्येचा विचार करत आहेत. त्यामुळे तातडीने बेकायदेशीर आयात थांबवायला हवी.

बेदाणा उत्पादकांना संकटातून बाहेर काढा

विशाल पाटील म्हणाले, बेदाणा निर्यातीला शासनाकडून अनुदान मिळत होते. परिणामी भारतीय बाजारपेठेतील बेदाण्याची मागणी आणि आवक याचे गणित जमत होते. पण, सध्या निर्यातीतील अनुदान बंद आहे. पुन्हा एकदा अनुदान सुरू करण्याची गरज आहे. शेतकरी हिताचे निर्णय गरजेचे आहेत. बेदाणा उत्पादकांच्या हिताचा निर्णय सरकारने करावा आणि त्यांना संकटातून बाहेर काढावे.

Web Title: Stop illegal import of Chinese raisins; MP Vishal Patil raises issue of grape growers in Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.