आरगला मंदिरातून दागिने चोरणाऱ्यास अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
By घनशाम नवाथे | Updated: January 12, 2025 19:54 IST2025-01-12T19:54:29+5:302025-01-12T19:54:51+5:30
साडे नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त

आरगला मंदिरातून दागिने चोरणाऱ्यास अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
घनशाम नवाथे,
सांगली : आरग (ता. मिरज) येथील पद्मावती मंदिरातून सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या अक्षय अर्जुन मोरे (वय २७, रा. गोंदीलवाडी रेल्वे गेट, पलूस आमणापूर रस्ता, ता. पलूस) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून सोन्याचांदीचे दागिने व दुचाकी असा ९ लाख ५४ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.
आरग येथील शितल आण्णासाहेब उपाध्ये (वय ६०) यांच्या मालकीचे पद्मावती मातेचे मंदिर आहे. दि. ८ रोजी मध्यरात्रीनंतर रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय मोरे याने मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश करून देवीच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. दि. ९ रोजी पहाटे हा प्रकार उघडकीस येताच सर्वत्र खळबळ उडाली होती. मिरज ग्रामीण पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिस तपासात सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित चोरटा हा कैद झाला होता. हे ‘फुटेज’ सर्वत्र ‘व्हायरल’ झाले होते. परंतू अक्षय याचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान होते. गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाला चोरट्याच्या माग काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. पथक माग काढत असताना त्यांना आरग येथील मंदिरात चोरी करणारा संशयित दागिने विक्री करण्यासाठी पाचवा मैल (ता. पलूस) येथे दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने तेथे जाऊन पाहणी केली. तेव्हा पाठीवर सॅक असलेला अक्षय मोरे आढळून आला. त्याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले. त्याच्या सॅकमध्ये सोन्याचांदीचे दागिने मिळाले. चौकशीत त्याने पद्मावती मातेच्या मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ७ लाख ४९ हजार रूपयाचे सोन्याचे दागिने, १ लाख ४० हजार रूपयाचे चांदीचे दागिने, ६५ हजार रूपयाची दुचाकी असा ९ लाख ५४ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. त्याला मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले.
निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज पवार, नितीन सावंत, कर्मचारी अनिल कोळेकर, दरिबा बंडगर, सागर लवटे, सागर टिंगरे, संदीप गुरव, नागेश खरात, सतीश माने, महादेव नागणे, मच्छिंद्र बर्डे, अमर नरळे, इम्रान मुल्ला, संकेत मगदूम, सचिन धोत्रे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिस रेकॉर्डवरील चोरटा
अटक केलेला अक्षय मोरे हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरूद्ध यापूर्वी पलूस, विश्रामबाग पोलिस ठाण्यात मालमत्तेविरूद्धचे गुन्हे दाखल आहेत.