महिलांच्या संरक्षणासाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध - चाकणकर; सांगलीत जनसुनावणीत ५५ तक्रारींचा निपटारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 18:39 IST2025-10-16T18:38:29+5:302025-10-16T18:39:29+5:30
जिल्हा यंत्रणांचे विशेष कौतुक

महिलांच्या संरक्षणासाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध - चाकणकर; सांगलीत जनसुनावणीत ५५ तक्रारींचा निपटारा
सांगली : ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या प्रत्येक तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न असून, सर्व यंत्रणांतून तक्रारदाराला मदत करण्यात येत आहे. यातून तक्रारदाराला न्याय देऊन महिलांची सुरक्षितता व संरक्षणासाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध, अशी ग्वाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिली. तसेच जनसुनावणीत ५५ तक्रारींचा निपटारा केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत बुधवारी सांगलीत जनसुनावणीच्या अध्यक्षस्थानावरून रूपाली चाकणकर बोलत होत्या. प्रारंभी सावित्रीबाई फुले व माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जनसुनावणीस आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील आदी उपस्थित होते.
चाकणकर म्हणाल्या, शासनाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक तरतुदी केल्या आहेत. त्यांची माहिती घेऊन महिलांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात तक्रार दाखल केली पाहिजे. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा, यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील महिलांकडून ५५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये वैवाहिक/कौटुंबिक २९, सामाजिक ९, मालमत्तासंदर्भात ७, कामाच्या ठिकाणी छळ ४ व इतर ६ अशा एकूण ५५ तक्रारींचा समावेश आहे. तीन पॅनलच्या माध्यमातून या तक्रारींवर सुनावणी घेतली. या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली.
येथे करा तक्रार
चाकणकर म्हणाल्या, महिलांनीही आत्मविश्वासाने आयुष्य जगावे. सुपर वूमन होण्याला प्राधान्य देण्याऐवजी महिला म्हणून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. महिलाविषयक कायदे, नियम, शासकीय योजनांची माहिती घ्यावी. अडचणीत असलेल्या महिलांनी १५५२०९ किंवा ११२ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा यंत्रणांचे विशेष कौतुक
राज्य महिला आयोगाची सांगलीमध्ये जुलै २०२३ मध्ये झालेल्या जनसुनावणीत आयोगाकडे दाखल झालेल्या तक्रारींच्या तुलनेत आजच्या जनसुनावणीत प्राप्त तक्रारींची संख्या कमी आहे. केसेस कमी असणारा हा पहिला जिल्हा असून, जिल्हा प्रशासनांतर्गत संबंधित सर्व यंत्रणांनी केलेल्या चांगल्या कामाची ही पोचपावती असल्याचे सांगून त्यांनी रूपाली चाकणकर यांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हाधिकारी यांच्या विशेष योजना
चाकणकर म्हणाल्या, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी महिलांसाठी लक्ष्मीमुक्ती, घरेलू कामगार आरोग्य शिबिर, ‘अस्वच्छ महिला स्वच्छतागृह दाखवा, एक हजार रुपये बक्षीस मिळवा’, दिव्यांग प्रमाणपत्र, नवरात्रोत्सवात नारीबलम् मालिकेंतर्गत महिलाविषयक योजनांना प्रसिद्धी आदी विविध उपक्रम राबवल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.