पारगड संवर्धन कामास लवकरच प्रारंभ
By Admin | Updated: January 29, 2015 00:07 IST2015-01-28T23:26:37+5:302015-01-29T00:07:46+5:30
विजय देवणे : विविध संघटना संस्थांची मदत घेणार

पारगड संवर्धन कामास लवकरच प्रारंभ
कोल्हापूर : किल्ले संवर्धन, विकास व पर्यटनवृद्धीसाठी चंदगड तालुक्यातील किल्ले पारगडला चंदगड शिवसेना, सामाजिक संघटनांनी दत्तक घेतले आहे. मिरवेल पारगड ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतही त्याला संमती मिळाली आहे. संवर्धन आणि पर्यटनवृद्धीच्या कामास ३ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी आज, मंगळवारी शाहू स्मारक भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
देवणे म्हणाले, अलीकडे पारगड परिसराचा अभ्यास करून स्थानिक लोकांशी चर्चा केली. अभ्यासक तज्ज्ञ, कार्यकर्ते, विविध मंडळांना सामावून घेत संवर्धन विकास आराखडा तयार केला. आराखड्याला ग्रामपंचायतीच्या १६ जानेवारीच्या ग्रामसभेत मंजुरी घेण्यात आली. त्यामुळे संवर्धन व विविध उपक्रमास येथील हिल रायडर्स, शिवदुर्ग प्रतिष्ठान, मैत्रेय प्रतिष्ठान माऊंटेनिअरिंग असोसिएशन, समीर अॅडव्हेंचर्स, विज्ञान प्रबोधिनी मित्र, निसर्गमित्र, अशा अनेक सामाजिक संस्थांचा सहभाग आणि तज्ज्ञ अभ्यासकांचे सहकार्य घेतले जाणार आहे. ३ रोजी सकाळी दहा वाजता पारगड किल्ल्यावर संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर यांच्या हस्ते विविध उपक्रमांना प्रारंभ करण्यात येणार आहे. त्याप्रसंगी गडाच्या पहिल्या पायरीवर गड पूजन होईल. तोरण बांधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक घालून भगव्या ध्वजाचे पूजन होईल.
टप्प्या-टप्प्यांने पारगडची माथा ते पायथा हद्द निश्चित करणे, चारही दिशेला भगवे ध्वज लावणे, गडभ्रमंती मार्ग निश्चित करणे, दोन्हीकडे दगडास चुना लावणे, तटबंदी, इमारत, मंदिर याकडे जाण्यासाठी अडथळा ठरणारे वृक्ष, झुडपे परवानगीने तोडणे, दिशादर्शक फलक लावणे, विशेष महोत्सवाचे आयोजन करणे, सुविधा निर्मिती करणे, सहलींचे आयोजन करणे, जंगल संवर्धन करणे, आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
कार्यक्रमास सरपंच विद्याधर काळे, पर्यावण तज्ज्ञ उदय गायकवाड, हिल रायडर्सचे प्रमोद पाटील, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, मैत्रेय प्रतिष्ठानचे डॉ. अमर आडके, महादेव गावडे, डॉ. संजय पाटील, प्रा. सुनील शिंत्रे आदी उपस्थित होते.
——————
फोटो - २७०१२०१५ - कोल- विजय देवणे
.............................................