संगीतमय जल्लोषात ‘सखी’ सदस्य नोंदणीस प्रारंभ

By Admin | Updated: January 28, 2015 01:02 IST2015-01-28T00:29:39+5:302015-01-28T01:02:34+5:30

सांगलीत कार्यक्रम : गीत, वाद्यांच्या तालावर थिरकल्या महिला

Start of 'Sakhi' member registration in musical concerts | संगीतमय जल्लोषात ‘सखी’ सदस्य नोंदणीस प्रारंभ

संगीतमय जल्लोषात ‘सखी’ सदस्य नोंदणीस प्रारंभ

सांगली : नव्या रंगांची मुक्त उधळण करीत, उत्साहाला साद घालत सखी मंचच्या नव्या वर्षातील सदस्य नोंदणीचा प्रारंभ संगीतमय जल्लोषात करण्यात आला. अवीट गाणी, वाद्यांची सुरावट आणि सुंदर निवेदनाने सजलेल्या ‘जिंदगी एक सफर’ या कार्यक्रमात ताल धरीत सखी सदस्यांनी अक्षरश: धमाल केली.
सांगलीच्या भावे नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सखी मंच सदस्य नोंदणी अभियानास सखी सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नव्या वर्षातील नव्या अभियानाची सुरुवात संगीतमय कार्यक्रमांनी करण्यात आली. सारेगम फेम निर्माता मिलिंद कुलकर्णी यांच्या ‘जिंदगी एक सफर’ या कार्यक्रमाने रसिक सदस्यांची मने जिंकली. हिंदी व मराठी चित्रपटातील गाजलेल्या अनेक सुंदर गाण्यांचे सादरीकरण करतानाच राजकुमार मगदूम यांच्या निवेदनाने त्याला मनोरंजनाचा साज चढविला. अनेक गाण्यांवर सखी सदस्यांनी धुंद होऊन नृत्य केले. टाळ्या, शिट्ट्यांच्या गजरात प्रत्येक गाण्याला दाद दिली.
कार्यक्रमाची सुरुवात मयूर फोटो स्टुडिओचे महेश तावरे, मिलिंद कुलकर्णी, राजकुमार मगदूम यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाली. गणेशवंदनेने संगीतमय प्रवासाला सुरुवात झाली. हिंदी, मराठी चित्रपटांतील गाजलेली गाणी, लावण्या यांनी कार्यक्रम रंगला. ‘ही पोली साजूक तुपातली’, ‘नाद खुळा’, ‘या रावजी, बसा भावजी’ अशा अनेक गाण्यांवर महिलांनी ताल धरला. मोनिका सांगलीकरच्या नृत्यालाही टाळ्या, शिट्ट्यांची दाद मिळाली. डॉ. दत्ता कुंभार यांनी सॅक्सोफोनद्वारे सादर केलेल्या जुन्या हिंदी चित्रपटातील गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. सादर झालेल्या लावण्यांनाही सखी सदस्यांनी डोक्यावर घेतले. तीन तास रंगलेल्या या कार्यक्रमांनी भावे नाट्यगृहात उत्साहाचे वारे वाहू लागले. संगीतमय कार्यक्रम आणि रसिकप्रेक्षक यांना एकमेकांमध्ये गुंफण्याचे काम निवेदक मगदूम यांनी केले. त्यांच्या उत्कृष्ट निवेदन कौशल्याचा सन्मानही ‘लोकमत’ परिवारातर्फेे करण्यात आला. अभिनेते श्रेयस तळपदे व जितेंद्र जोशी यांच्याहस्ते त्यांना गौरविण्यात आले.
रश्मी सावंत, इम्तियाज शिलेदार, जाफर मुजावर, वैशाली गदे्र-कदम, वर्षा मंत्री या गायकांनी रसिकांची वाहवा मिळविली. ध्वनी संयोजन राजू सुपेकर, अकबर यांनी, तर विद्युत व्यवस्था अल्लाबक्ष जमादार यांनी केली. (प्रतिनिधी)

संगीतमय कार्यक्रमाने सखी मंच सदस्य नोंदणीस प्रारंभ होतानाच शेकडो महिलांनी यावेळी नोंदणी करून पहिल्या कार्यक्रमाचा आनंद लुटला. कार्यक्रमाच्या ठिकाणी सदस्य नोंदणी सुरू होती. कार्यक्रमानंतरही सदस्य नोंदणी अभियानास अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून नोंदणी मर्यादित कालावधीकरिताच आहे.

Web Title: Start of 'Sakhi' member registration in musical concerts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.